Pune: पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये आज पहाटे बिबट्या आढळला. हा बिबट्या मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत घुसल्याचं कंपनीमधील एका चालकाच्या निदर्शनास आलं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन बिबट्या असल्याची खात्री करून घेतली. तसेच त्यांनी याबाबत वनविभागाला कळवलं.जवळपास सात तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. कंपनीच्या बॉडी शॉप सेक्शनमधील कामगारांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आलं होतं. 


चाकण एमआयडीसीत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या असल्याने, या एमआयडीसीची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख आहे. याच एमआयडीसीमधील मर्सडिज बेन्ज या आंतरराष्ट्रीय कंपनीत आज बिबट्याने शिरकाव केला. यामुळं एमआयडीसीसह आसपासच्या परिसरात खळबळ उडाली. सर्वात आधी हा बिबट्या कंपनीतील एका चालकाच्या नजरेत आला. ती वेळ पहाटे पाचची होती, मग त्या चालकाने याची कल्पना कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना दिली. बिबट्या कंपनीत आलाय म्हटल्यावर सुरक्षा रक्षकांचे धाबे दणाणले. त्यांनी तातडीनं बिबट्या ज्या दिशेला आढळला तिकडे धाव घेतली. खरच बिबट्या आलाय का? याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी आधी स्वतः बिबट्या पहायचं ठरवलं. कारण आंतराराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीबाबत अशी माहिती थेट बाहेर देणं जिकिरीचं होतं. त्यामुळं खबरदारी घेत सुरक्षा रक्षका पथकानं बिबट्याचा मागोवा घेतला. प्रत्यक्षात तो नजरेस पडला तेव्हाच त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाचे पथक तातडीनं मर्सडिज बेन्ज कंपनीत दाखल झालं. 


कंपनी साधारण शंभर एकरमध्ये विस्तारल्यानं बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर होतं. मदतीला पिंपरी चिंचवड पोलीस ही दाखल झाले होते. सर्वात आधी कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. वनविभागानं ठिकठिकाणी सापळे रचायला सुरुवात केली. दरम्यान, 20  जणांच्या पथकानं युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतलं. बिबट्याला कोणतीही इजा पोहचू नये, ही जबाबदारी सुद्धा वनविभागाची होती. त्यामुळं बिबट्याला जेरबंद करण्यात अडचणी येत होत्या. मग शेवटी बिबट्याला बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देण्याचं ठरलं. त्यानुसार बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं. अखेर सात तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. अडीच वर्षाच्या बिबट्याला पकडताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 


मर्सडिज बेन्ज कंपनीला काही ठिकाणी सुरक्षा भिंती आणि काही ठिकाणी तारेचं कंपाऊंड आहे. त्यामुळं बिबट्यानं तारेच्या कंपाउंडवरून कंपनीत शिरकाव केला असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याआधी एमआयडीसी परिसरात बिबट्या कधी आढळला नव्हता. मग अचानकपणे तो येथे कुठून आला? हे अद्याप समजू शकलेलं नाही. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha