पुणे : पुण्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीला झालेला मुलगा आपल्यापासून झाला नसल्याचा पतीला संशय होता. त्यामुळे त्याने पत्नीला माझ्यासोबत राहायचे असेल तर या मुलाला सोडून दे असे सांगितले. आणि त्यानंतर या दोघा आई-बापांनी दोन महिन्याच्या चिमुरड्याला खडकीतील एका चर्चजवळ कापडी पिशवीत गुंडाळून ठेवले आणि निघून गेले. त्यानंतर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काही नागरिकांना पिशवीतले हे बाळ सापडलं. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन या बाळाच्या आई बाबांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ते सापडले नाहीत. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता समोर आले हे धक्कादायक सत्य.


खडकी पोलिसांनी दोन महिन्याचा या गोंडस बाळाचा फोटो आपल्या व्हॉट्सअॅपला डीपी ठेवला होता. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर त्यांनी हा फोटो शेअर देखील केला होता. त्यानंतर व्हायरल झालेला हा फोटो त्या बाळाच्या मामाच्या व्हॉट्सअॅप वर जाऊन पोहोचला. मामाने आपल्या बहिणीला बाळा विषयी विचारणा केली असता त्यांनी काही दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र मामाने व्हॉट्सअॅपवर ज्या बाळाचा फोटो पाहिला होता तोच आपला भाचा आहे, यावर तो ठाम होता.


त्यानंतर मामाने थेट पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी बाळाचे आई वडील आणि मामासह ससून रुग्णालय गाठत त्यांना बाळ दाखवले. परंतु येथेही आई-वडील हे बाळ आपलेच आहे हे मान्य करायला तयार नव्हते. यावेळी पोलिसांना त्यांच्या वागण्या-बोलण्यात विसंगती जाणवली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता अखेर सत्य समोर आले.


सात वर्षापूर्वी या जोडप्याचे लग्न झाले होते. यातील नवरा मुलगा हा इंजिनिअर असून एका कंपनीत चांगल्या पदावर काम करतो. त्यांना पाच वर्षांचा एक मुलगाही आहे. परंतु पती-पत्नी सातत्याने होणाऱ्या वादामुळे पत्नी तीन वर्ष माहेरी राहिली होती. त्यानंतर 1 वर्षापूर्वी ते पुन्हा एकदा एकत्र आले. एक वर्षानंतर त्यांना मुल देखील झालं. परंतु हे मूल आपलं असल्याचा संशय आरोपी पतीला होता. यावरून त्यांच्यात पुन्हा एकदा वाद सुरू झाले. आणि आरोपीने पत्नीला माझ्यासोबत राहायचे असेल तर कुणाला तरी एकाला सोडून द्यावे लागेल असे सांगितले. यानंतर त्यांनी दोन महिन्याच्या चिमुरड्याला खडकीतील एका चर्च जवळ प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले अन् निघून गेले.


पोलिसांनी याप्रकरणी त्या बाळाच्या आई-वडिलांना अटक केली आहे. तर बाळ सध्या ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली व्यवस्थित आहे.