Pune Crime News: पुण्याच्या जुन्नर तालुक्यात (Pune Junnar News) एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या (Farmer Suicide )केली आहे. आत्महत्येपूर्वी या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi Birthday) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीत तसं नमूद केलं आहे. दशरथ लक्ष्मण केदारी असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव होते. मोदी सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव न दिल्याची खंत ही व्यक्त केली आहे. कांदा-टोमॅटोचे ढासळणारे दर, कोरोना-अतिवृष्टीचं संकट आणि फायनान्स कंपन्या आणि पतपेढीवाले हफ्ता भरण्यासाठीचा ससेमिरा यामुळं पुरता बेजार झाल्याचं ही चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 


आम्ही भीक मागत नाही. अनेक संकटांचा सामना करत आम्ही शेतीत विविध पिकं लावतो, हा एक जुगाराचा प्रकारच आहे. अशा प्रकारांमुळं मी जीवनास कंटाळलो आहे. म्हणून आज मी आत्महत्येस करतोय. आम्हाला आमच्या हक्काचा बाजार भाव द्या, अशी मागणी आत्महत्या करताना त्यांनी मोदी सरकारकडे केली. तर जाता जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.


दशरथ केदारी हेजुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद गावचे रहिवाशी होते. त्यांच्या मालकीची एक एकर शेती आणि एक दुचाकी होती. दोन्हीसाठी अडीच लाखांचं कर्ज काढलं होतं. यातून मे महिन्यात कांद्याचं पीक हाती आलं. मात्र तेव्हा दर 10 रुपयांच्या घरात होते. म्हणून त्यांनी कांद्याची साठवणूक केली, यासाठी काही रक्कम त्यांना मोजावी लागली. परंतु पुढे ही दर असाच कायम राहिला, त्यात पावसामध्ये निम्मा कांदा खराब ही झाला. हा फटका बसल्यावर ही ते खचले नाहीत. त्यांनी पुन्हा त्याच शेतात टोमॅटो आणि सोयाबीनचे पीक घेतले. 


पण पहिल्या पावसात टोमॅटो खराब झाला, तर गेल्या आठवड्यातील पावसात सोयाबीनचे पीक ही हातातून निसटले. या सोयाबीन पिकांचा पंचनामा करावा यासाठी दशरथ 17 सप्टेंबरला तलाठी कार्यालयात गेले. दोन तास तिथं बसून पंचनाम्याची मागणी करून परतले. परंतु त्यानंतर दुपारच्या सुमारास आधी विष प्राशन केलं अन मग शेतातील तळ्यात उडी घेत आत्महत्या केली.


इतर महत्वाच्या बातम्या