Pune FTII Hunger Strike : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या एका बॅचमेटला कॉलेज प्रशासनाने काढून टाकल्याच्या विरोधात आंदोलन पुकारलं आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचं उपोषण सुरु आहे. अशातच आता उन्हामुळे आणि बाकी काही कारणांमुळे पुन्हा एका विद्यार्थ्याचीही प्रकृती खालावली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Pune FTII Hunger Strike : यापूर्वी एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावली होती
यापूर्वी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि नंतर डिस्चार्ज देण्यात आला. 15 मेपासून विद्यार्थी कॉलेज कॅम्पसमध्ये आंदोलन करत आहेत. 2020च्या बॅचच्या विद्यार्थ्याला बाहेर काढल्याबद्दल कॉलेज प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले होते. पाच विद्यार्थ्यांना पूर्वसूचना न देता संस्थेतून काढून टाकण्यात आल्याचे विद्यार्थी संघटनेने म्हटलं आहे.
Pune FTII Hunger Strike : विद्यार्थ्यांची मागणी काय?
त्यापैकी चौघांना 1 मे रोजी झालेल्या परिषदेच्या बैठकीनंतर वर्गात जाण्याची परवानगी देण्यात आली होती, तर एका विद्यार्थ्याला परवानगी नव्हती. विद्यार्थ्याला कमी उपस्थिती आणि क्रेडिट्समुळे त्यांना परीक्षा देण्यास नकार दिला होता. हा विद्यार्थी मानसिक तणावात होता. विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू होते आणि त्याच्या वैद्यकीय परिस्थितीचा विचार केला जावा जेणेकरुन त्याला चालू सेमिस्टरसाठी पात्र होण्यासाठी क्रेडिट मिळू शकतील, अशी मागणी आता विद्यार्थी करताना दिसत आहेत.
Pune FTII Hunger Strike : विद्यार्थी मानसिक तणावात होता...
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून वर्ग थांबवले आहेत. 5 विद्यार्थ्यांना 75 टक्के हजेरी नसल्याने आणि हवे तितके क्रेडिट नसल्याने परीक्षा देता येणार नाही, असे सांगितले. नंतर शैक्षणिक परिषदेने 4 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी दिली मात्र एकाला पुढील वर्षी परीक्षा देण्यास सांगितले. त्यानंतर 2020 बॅचमधील सर्वच विद्यार्थ्यांनी वर्गात जाणे बंद केले आहे. 15 मेपासून 3 विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. यातील एका विद्यार्थ्याला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आणखी दोन विद्यार्थी उपोषणाला बसले होते. इतकं होऊनही कॉलेज प्रशासनाकडून कुणीही विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घ्यायला आलं नसल्याचं विद्यार्थी सांगतात. ड्रॉप करण्यात आलेला विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. पण प्रशासन मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतं. विनंती करुनही प्रशासन त्याच्या समस्येकडे लक्ष देत नव्हतं, असंही विद्यार्थी सांगतात.