Pune Covid Update : पुण्यात (pune) सिंगापूरहून आलेला एक प्रवासी कोरोना (Corona) पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे पुण्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. विमानतळावरच प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे. या प्रवाशाची चाचणी करण्यात आली होती. त्यात अहवालात प्रवासी पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे. दरम्यान सध्या पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 54 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
पुणे विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे. त्याशिवाय प्रवासादरम्यान आणि विमानताळावर मास्क वापरण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कोथरुड परिसरातील 32 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. या महिलेला कोरोनाची कोणतीही लक्षणं नाही आहे. त्यामुळे त्यांंच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांंनी दिली आहे. काळजी करण्याचं कारण नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
परदेशात रुग्णांची संख्या लक्षात घेता या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी, त्याचप्रमाणे यातून निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार पुणे प्रशासन मागील काही दिवसांपासून कामाला लागलं आहे.
कोरोनाबाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कोविड टास्क फोर्स समितीची काल (28 डिसेंबर) बैठक घेण्यात आली आहे. सध्या चीन, अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया या देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आणि पुणे जिल्ह्यातही खबरदारी म्हणून प्रतिबंधक उपाययोजन राबवण्यासाठी बैठका घेतल्या जात आहे.
आरोग्य यंत्रणा सज्ज करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात यावी. ऑक्सिजन प्रकल्प, लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टँक, मेडिकल ऑक्सिजन पाईपलाईन या आवश्यक साहित्य व्यवस्थित करण्यात यावं आणि जास्तीत जास्त नागरिकांचं लसीकरण करण्याकडे लश्र केंद्रित केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
बूस्टर डोस घेण्याचं आवाहन
पुणे जिल्ह्यात कोविडचे 54 रुग्ण असून रोज 11 रुग्ण बरे होत आहेत. कोविड लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 1 कोटी 93 लाख 45 हजार 470 नागरीकांचं कोविड लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 99 लाख 5 हजार 418 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. 84 लाख 59 हजार 838 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर फक्त 9 लाख 80 हजार 219 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. बूस्टर डोस घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.