Pune Bypoll election : पुण्यातील कसब्याच्या (Pune Bypoll Election) निवडणूकीत राज्यातील राजकीय पक्षांनी आपली सर्व ताकद पणाला लावलेली असताना बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले या निवडणुकीत मात्र काही मोजक्या कार्यकर्त्यांना सोबत घेत प्रचार करताना दिसत आहे. बिचुकलेंच्या (abhijeet Bichukle) उमेदवारीमुळे कसब्याच्या तंग वातावरणातील ताण थोडा हलका होण्यास मदत मिळत आहे. अभिजीत बिचुकलेंनी कसब्यातुन त्यांच्या 'कपाट' या चिन्हाचा प्रचार सुरु केला.एरवी मतदार उमेदवारांकडून काही अपेक्षा ठेवत असतात पण बिचुकलेंच्या बाबत मात्र उलट पहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान बिचुकलेचे फॅनच त्यांना चहाची ऑफर देताना दिसत आहेत.


पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीची राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे. या निवडणुकीत तगडे नेते प्रचारासाठी उतरत आहे. भाजपने तर 40 स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. त्यातील अनेक नेत रोज पुण्यात प्रचार करताना दिसत आहे. त्यासोबतच महाविकास आघाडीकडूनही दणक्यात प्रचार करताना दिसत आहे. त्यातच बिचुकले मात्र मोजक्या प्रचारकांना सोबत घेत प्रचार करताना दिसत आहे. कसब्यातील अनेक घरात जाऊन सगळ्यांना प्रचाराच्या पत्रकांचं वाटप करताना दिसत आहे. त्यासोबतच अनेक मंदिरांनादेखील ते भेट देत आहे.


पत्रकं घेण्याचं सोडून चाहते फोटो काढण्यात व्यस्त



या प्रचारादरम्यान बिचुकले सगळ्यांना पत्रकांंचं वाटप करत आहेत. मात्र हे पत्रकं घेण्यासाठी नाही किंवा प्रचारात सहभागी होण्यासाठी नाही तर त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते कसबा मतदार संघात गर्दी करताना दिसत आहे. त्यासोबत ज्या दुकानांमध्ये ते प्रचारासाठी जात आहे. त्या दुकानदारांकडून त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची ऑफर दिली जात आहे. मतासाठी बिचुकलेंना चाहत्यांच्या चहाच्या गाडीवरील चहासुद्धा प्यावा लागत आहे. 


अर्ज दाखल केल्यावर आल्या होत्या धमक्या...



कसब्यातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बिचूकलेंना धमकीचा फोन आला होता. मी कसबा मतदार संघातून अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर मला विरोधकांकडून मी अर्ज मागे घ्यावा तसेच पुणे सोडून साताऱ्याला जावं आणि असं जर तुम्ही केलं नाही तर तुमचा खून करू अशी धमकी देण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. अभिजीत बिचुकलेने धमकीनंतर जीवाला धोका असल्याने त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना तात्काळ संरक्षण देण्याची मागणी केली होती. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घ्यावे. आचारसंहितेदरम्यान असा प्रकार घडणं ही गंभीर बाब आहे, असंही बिचुकले म्हणाले होते.