Pune Bypoll election : कसबा पोटनिवडणुकीत (Pune Bypoll Election) सध्या धुमधडाक्यात प्रचार सुरु आहे. मतदार संघात तंग वातावरण झालं आहे. याच प्रचारांच्या वाातवरणात मात्र हिंदू महासंघांचे उमेदवार आनंद दवे यांनी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या प्रचारासाठी आजारी असतानाही बापटांना (Girish bapat) प्रचारासाठी मैदानात यावं लागलं. बापटांची ही अवस्था पाहून हिंदू महासंघाने प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याचं दवेंनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी मेसेज करत माध्यमांना ही माहिती दिली आहे.
मेसेज मध्ये काय लिहिलंय?
बापट पाहून पर्रीकर आठवले...आज मी व्यक्तिशः प्रचार करणार नाही त्रास बापट साहेबांना होत होता... पण यातना आम्हाला जाणवत होत्या. आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे याचा मानसिक त्रास आम्हाला होत असल्यामुळे मी आज व्यक्तिशः प्रचार करणार नसल्याचं ठरवलं आहे, असं त्यांनी माध्यमांना पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहिलंय.
दवे म्हणाले की, भाजपचा हा सगळा प्रयत्न फक्त पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सुरु आहे. यासाठी भाजप गिरीश बापट यांना मैदानात उतरवत असेल तर त्यासाठी हिंदू महासंघ कारणीभूत असल्यास त्याच्या यातना आम्हाला होत आहे. गिरीश बापट यांना पाहून काल मला दुःख झाले. त्या गोष्टीचा आत्मक्लेश म्हणून आजच्या दिवशी आम्ही प्रचार करणार नसल्याचे दवे यांनी जाहीर केले आहे. बापटांना आमच्यामुळे त्रास होत असल्यामुळे आज दिवसभर आम्ही प्रचार करत नसल्याचं त्यांनी जाहीर केल्याचं सांगितलं आहे.
हिंदू महासंघामुळे भाजपची धाकधूक वाढली...
मागील चाळीस वर्ष गिरीश बापट यांचे कसब्यावर वर्चस्व आहे. त्यांनीच दिवंगत आमदार मुक्ता टिळकांना राजकारणात आणलं होतं. आज त्यांच्याच निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे त्यांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी आजारी असतानाही प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला . कसबा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओखळला जातो. मात्र कसब्यात यंदा ब्राह्मणांना उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. त्यात महाविकास आघाडी कसब्यातील बंडखोरी रोखण्यात यशस्वी झाले. ब्राह्मणांच्या नाराजीचा मुद्दा समोर ठेवत हिंदू महासंघाने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं. भाजपचं टेन्शन हिंदू महासंघामुळे वाढलं त्यामुळे त्यांनी आजारी असलेल्या बापटांना मैदानात उतरवलं, अशा चर्चा सुरु आहे. हिंदू महासंघाच्या भूमिकेमुळे भाजपला एवढे प्रयत्न करावे लागतं आहे. बापटांना त्रास द्यावा लागत आहे याचं कारण देत एक दिवस प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उद्यापासून ते प्रचार करणार आहेत.