Pune BJP : पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय सोधण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी अधिक वाहतूक पोलीसांची गरज आहे, त्यामुळे वाहतूक पोलिसांची संख्या वाढवा, अशी मागणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली. तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिल्याची माहिती भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. मुळीक आणि शहर भाजपच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन वाहतूक कोंडी सोडवण्याच्या विषयावर चर्चा देखील केली.
शहरातील सर्व चौकांचे स्वतंत्र संस्थेमार्फत सर्वेक्षण करावे. ज्या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होते, त्याची कारणं शोधावीत आणि त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती. त्याला आयुक्तांनी तत्वतः मान्यता दिली. तसेच प्रत्येक चौकात गरजेनुसार एक-दोन अशा 400 वॉर्डनच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार आहेत, असं मुळीक यांनी सांगितलं आहे.
शहरातील वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलिस विभाग, पुणे महापालिका, मेट्रो, सार्वजनिक रस्ते विभाग, राज्य परिवहन मंडळ, पुणे महानगर परिवहन महामंडळ, स्मार्ट सिटी अशा सर्व महत्त्वाच्या विभागांची एकत्रित उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी एक-दोन दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अॅक्शन प्लान तयार
पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त मिळून अॅक्शन प्लान तयार करतील. रस्त्यावर चलान फाडण्यात वेळ घालवू नये त्यासाठी शहरात नवीन नाले बांधण्याची गरज आहे. मोठे नाले बांधण्यासाठी काम करा, अशा सूचना या बैठकीत चंद्रकांत पाटलांनी केल्या होत्या.
पुण्यात 400 किमीचे रस्ते दुरुस्त करण्याचा प्रस्ताव
पुणे शहरात प्रत्येक परिसरात वाहतूक कोंडी होते. खड्ड्यांमुळे वाहनाची गती कमी होत असल्याने अपघात होतात. त्यामुळे वेगळी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सुरुवातील शहरातील रस्ते नीट करण्याचं नियोजन आहे. त्यासाठी शहरातील 400 किलोमीटरचे रस्ते दुरुस्त करण्यासाठीच्या आराखड्याला मंजुरी दिल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सरकार आल्यानंतरच्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे रस्ते येत्या काळात चांगले होऊन वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.