मुंबईः तूर डाळीवरून ऐन सणासुदीच्या काळात राडा नको म्हणून राज्य सरकारने खुल्या बाजारात तूर डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. किराणा दुकानातून आता केवळ एक किलोच डाळ मिळणार आहे. या विक्रीवर जिल्हाधिकार्‍यांचे नियंत्रण राहणार असल्याचं फर्मानच आज अन्न व नागरी पुरवठा विभागाने काढलं आहे.

 

महाराष्ट्रात तूर डाळीचा पेरा घटला आहे. त्यामुळे उत्पादनही कमी झालं आहे. परिणामी तूर डाळीचे भाव प्रचंड भडकले आहेत. तूर डाळ सध्या 200 रुपये किलो असून हरभरा, मूग, उडीद तसेच मसूर डाळही 150 ते 180 रुपये किलोने विकली जात आहे.

 

भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच तूर डाळ देखील दिलासा द्यायला तयार नाही. पुढचा महिना सणावारांचा आहे. त्यामुळे डाळीवरून महाभारत घडू नये यासाठी सरकारने खुल्या बाजारात तूर डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.