नांदेड : पबजीसारखे ऑनलाईन गेम मुलांसाठी व्यसन बनले आहेत. धक्कादायक म्हणजे या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर अवघी 13 वर्षांची शाळकरी मुलगी परराज्यातील युवकासोबत पळून गेल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. ऑनलाईन गेमच्या विळख्यात आता अल्पवयीन मुलं/मुलीही अडकत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे.

पबजीसारख्या ऑनलाईन गेमचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ऑनलाईन गेमच्या व्यसनामुळे अनेक युवक वेडसर झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. त्यात आता पालकांना आणखी चिंतेत टाकणारी घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर अवघी 13 वर्षांची शाळकरी मुलगी परराज्यातील युवकाबरोबर पळून गेली.

हा ऑनलाइन गेम खेळत असताना इतर स्पर्धकांशी बोलता येतं. त्यामुळे या ऑनलाइन गेमच्या माध्यमातून नांदेडमधील एका 13 वर्षीय तरुणीची पंजाबमधील 19 वर्षीय तरुणाशी ओळख झाली. काही महिन्यापासून गेममुळे ते एकमेकांच्या संपर्कात आले आणि त्याचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. गेल्या 19 नोंव्हेबरला ती मुलगी युवकासोबत नांदेडहून पंजाबला पळून गेली.

शाळेत जाण्यासाठी निघालेली मुलगी घरी परतली नाही, म्हणून पालकांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तंत्रिकदृष्ट्या तपास केला आणि मुलगी ऑनलाइन गेममुळे पंजाब राज्यात पळून गेल्याचे समोर आले. पोलिसांच्या एका पथकाने जाऊन 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या बाबतीत पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन यानिमित्ताने पोलिसांनी केले आहे.

खास मुलींना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑनलाइन गेम सुरु झाले आहेत. काही भामटे या गेम्सचा वापर करुन मुलींना आपल्या जाळ्यात फसवत आहेत. त्यात नांदेडची घटना सर्वच पालकांना चिंतेत टाकणारी आहे. त्यामुळे आपली मुलं ऑनलाइन गेमच्या व्यसनी तर पडत नाहीत ना? याची काळजी सर्व पालकांनी घेणे गरजेचे आहे.