Pune Police Viral News : पुणे (pune) पोलिसांच्या (police) कारवाईचा हटके अंदाज आतापर्यंत अनेकदा पाहिला आहे. अनेकदा आरोपींना रस्त्यावरच चोप दिला तर अनेकदा त्यांची भररस्त्यात धिंड काढली. त्यासोबतच पुणे पोलिसांच्या माणुसकीचं दर्शनही आपल्याला अनेकदा घडलं आहे. असाच पुणे पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन देणारा प्रसंग घडला आहे. एक 72 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक पुणे महापालिकेच्या रस्त्याने जात असताना त्यांना चक्कर आली आहे. त्यामुळे ते रस्त्यावरच कोसळले आणि बेशुद्ध झाले होते. बबनराव डोंगरे असं या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाये यांनी मदत केली. त्यांच्या या कामगिरीची सध्या पुण्यात चांगलंच कौतुक होत आहे. 


डोंगरे यांना भररस्त्याच चक्कर आली. चक्कर आल्याने ते जागेवरच कोसळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. महापालिकेच्या परिसरात त्यांना बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र त्यांना मदत करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नव्हतं. डोंगरे यांना उपचाराची गरज होती मात्र त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोणीही सरसावले नाहीत. त्याचवेळी कोर्टात रिमांडसाठी निघालेले पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाये यांनी हा सगळा प्रकार पाहिला. त्यांनी गर्दीत जाऊन प्रकरणाची माहिती घेतली. त्यांच्यावर प्रथमोपचार करुन बघितला मात्र त्यांना शुद्ध येत नव्हती. त्यानंतर त्यांनी डोंगरे यांना तातडीने रिक्षात बसवून रुग्णालयात गेले. 


ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी डोंगरे यांच्यावर तातडीने उपचार सुरु केले. काही वेळ डोंगरे बेशुद्धच होते. मात्र शुद्धीवर येतपर्यंत पोलीस जायभाये रुग्णालयातच थांबून होते. त्यानंतर जायभाये यांनी डोंगरे यांची चौकशी केली. त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क केला आणि त्यांच्या मुलांना रुग्णालयात बोलवून घेतलं. त्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले आहे. शिवाय शहरात देखील त्यांच्या या तत्परतेचं कौतुक होत आहे. 


खासगी कामासाठी पालिकेत आले होते...


ज्येष्ठ नागरिक बबनराव डोंगरे हे भोसरी परिसरातील रहिवासी आहेत. खडकीतील दारुगोळा कारखान्यातून निवृत्त झाले आहे. खासगी कामासाठी ते महापालिकेच्या परिसरात आले होते. त्यावेळी पालिकेच्या समोरच त्यांना चक्कर आली. त्यानंतर ते बेशुद्ध पडले होते. 


पोलीसही शेवटी माणूसच..


पुणे पोलिसांचे अनेक असे किस्से आतापर्यंत आपण बघितले आहेत. त्यासोबतच त्यांचा कठोरपणाही बघितला आहे. काही दिवसांपासून महापालिकेच्या परीक्षेसाठी आलेल्या एका दाम्पत्याच्या लहान बाळाला पोलिसांनी सांभाळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी पोलिसांमधील आईचं दर्शन झालं होतं.