रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊनची घोषणा झाली आणि कोकण रेल्वे देखील ठप्प झाली. अगदी दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत धावणारी कोकण रेल्वे थांबल्याने लाखो प्रवाशांचे हाल झाले. पण, अशा कठीण प्रसंगी देखील कोकण रेल्वे मदतीला धावून आली. देशाच्या कानाकोपऱ्यात जीवनावश्यक वस्तु असो किंवा औषधे आणि अन्नधान्य देखील कोकण रेल्वेच्या माध्यमातून पोहोचवली गेली. कोकणातील अनेक जण इतरत्र अडकून पडले होते. त्यांना आपल्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी देखील कोकण रेल्वेने पेलली. त्यामुळे कोकण रेल्वे केव्हा रुळावर येणार याची देखील सर्वांना उत्सुकता होती. हजारो, लाखो प्रवाशी त्याची वाट पाहत होती. आता या साऱ्यांसाठी कोकण रेल्वे गुड न्यूज घेऊन आली आहे. कारण, कोकण रेल्वे मार्गावरील पीआरएस काऊंटर अर्थात Public Reservation System देखील सुरू होणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली ही काऊंटर 22 जून पासून सुरू होणार आहेत. कोकण रेल्वेकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या स्टेशन्सवर होणार पीआरएस काऊंटर सुरू?
कोकण रेल्वे मार्गावरील माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडप्पी, कुमटा, बेंदूर येथील कोकण रेल्वेची काऊंटर उद्यापासून सुरू होणार आहेत. त्यामुळे आता मोठा दिलासा हा लाखो प्रवाशांना मिळणार आहे.
कोणत्या ट्रेन्स धावणार?
कोकण रेल्वे मार्गावरील पीआरएस काऊंटर सुरू असल्याने कोणत्या आणि किती ट्रेन्स सुरू होणार याची देखील उत्सुकता आता सर्वांना लागली आहे. पण, त्याबाबतचा निर्णय देखील लवकरच होणार आहे. याबाबत लवकरच एक बैठक होईल आणि त्यानंतर कोणत्या आणि किती ट्रेन्स चालावायच्या याचा निर्णय घेतला जाणार आहे. अद्याप तरी कोणत्या ट्रेन्स धावणार याची कोणतीही माहिती अधिकृतरित्या कोकण रेल्वेकडून देण्यात आलेली नाही.
Piyush Goyal on railway service | एक जूनपासून देशात 200 रेल्वे गाड्या सुरू होणार : रेल्वे मंत्री पियुष गोयल