रायगड : पूर्वी मुंबईतून चाकरमानी हा गावी आला की गावातील ग्रामस्थ आवर्जून त्याची विचारपूस करीत असे. पण कोरोनाच्या भीतीमुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना गावात घेण्यास हेच गावकरी आता घाबरत आहेत. मात्र याला अपवाद ठरली आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चौल ग्रामपंचायत. या चिमण्यांनो परत फिरा रे… घराकडे आपुल्या, अशी साद या ग्रामपंचायतीने संकटात सापडलेल्या आपल्या चाकरमान्यांना घातली आहे. कोरोना संकटकाळात चौल गावाने आपल्या माणसांप्रती माणूसकी दाखवित गावात स्वीकारण्याचे औदार्य अन् धैर्य दाखविले आहे. त्यांची ही कृती अन्य गावांनी आदर्श घेण्यासारखी व अनुकरणीय आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई, ठाणे या मोठ्या शहरांमध्ये नोकरी धंद्यानिमित्त गेलेले चाकरमानी आता पुन्हा गावात येऊ लागले आहेत. मात्र गावी आल्यानंतर कोरोनाच्या भीतीमुळे त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी सध्या चाकरमानी आणि ग्रामस्थ असा संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र याला अपवाद ठरले आहे ते चौल गाव. नोकरी, व्यवसायानिमित्ताने मुंबई किंवा अन्य ठिकाणी गेलेल्या चाकरमान्यांना गावात यायचे असेल तर त्यांना अडविले जात नाही.
गावात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांची ग्रामपंचायतीमधील कोरोना नियंत्रण कक्षात नोंद घेतली जाते, त्यानंतर रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली जाते आणि हातावर होम क्वॉरंटाईन शिक्का मारला जातो. ज्यांना क्वॉरंटाईन करावयाचे आहे त्यांच्यासाठी गावात चौल जिल्हा परिषद केंद्र शाळा, भोवाळे जिल्हा परिषद शाळा, आग्राव जिल्हा परिषद शाळा आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे ज्युनिअर कॉलेज अशा चार ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. या क्वॉरंटाईन कक्षातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गावाने उत्तम व्यवस्था केली आहे. या ठिकाणी दिवसा अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांची तर रात्री ग्रामपंचायत पुरुष कर्मचारी, कोतवाल यांची ड्युटी लावण्यात आलेली आहे. क्वॉरन्टाईन केलेल्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडून जेवणाचा डबा पोहोचविण्याची देखील व्यवस्था ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. इतकेच नाही तर भविष्यात नातेवाईक नसलेले कुटूंब जरी गावात आले तरी त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था गावातील खानावळीमार्फत होईल, याची तजवीज करुन ठेवण्यात आली आहे.
10 हजार 155 लोकसंख्या असलेल्या या चौल गावात आतापर्यंत मुंबईतून जवळपास 475 चाकरमानी आले आहेत. त्यांची गावात विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांची रोज आरोग्य तपासणी केली जात आहे. विलगीकरण कक्षात असलेल्या चाकरमान्यांची गावचे सरपंच,ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासन आपुलकीने चौकशी करीत असतात. करोनाच्या संकटकाळात अन्य गावातील नागरिकांनी चाकरमान्यांना विरोध केला असता तरी चौल ग्रामपंचायत आमच्या पाठीशी ठाम उभी राहिल्याने आम्ही गावचे आणि येथील प्रशासनाचेही खूप खूप आभारी आहोत, अशी कृतज्ज्ञतेची भावना या क्वॉरंटाईन कक्षात असलेल्यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
- नात्याने झिडकारलं, परक्याने स्वीकारलं; कोलकाताहून परतलेल्या पुण्यातील तरुणीचं सांगलीतील अनोळखी कुटुंबासोबत वास्तव्य
- Corona warriors | कोरोनावर मात केलेल्या पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे अनोखे स्वागत
Ground report on Migration | फाळणीनंतरचं सर्वात मोठं स्थलांतर!, थेट उस्मानाबादहून ग्राऊंड रिपोर्ट