पंढरपूर : धनगर आरक्षणासाठी गेल्या पाच दिवसांपासून पंढरपूरमध्ये सुरु असलेल्या आमरण उपोषणामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली आहे. मात्र आंदोलकांनी उपचारास घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता परिस्थिती चिघळू लागली आहे.

धनगर आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांपासून 9 उपोषणकर्त्यांनी पोटात अन्नाचा कणही न घेतल्याने सर्वच आंदोलकांच्या शरिरातील शुगर लेवल झपाट्याने कमी होत आहे. यापैकी तिघांची प्रकृती जास्तच ढासळल्यानंतर त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र या आंदोलकांनी उपचार घेण्यास नकार दिला आणि ते पुन्हा उपोषणस्थळी आंदोलनात सामील झाले.

'आंदोलनकर्त्यांचा निरोप 3 दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पोहचवला असला तरी अद्याप शासनाकडून याबाबत कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने धनगर समाजात आता संतापाचे वातावरण तयार होऊ लागले आहे. आमची मागणी मान्य होईपर्यंत आम्ही असेच बसून राहणार', अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. प्राण गेले तरी आम्ही समाजासाठी उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्ते पांडुरंग मिरगळ यांनी सांगितले आहे.

मराठा समाजाप्रमाणे धनगर आरक्षणप्रश्नी उच्च न्यायालयात सलग तारखा देऊन समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले द्यावेत, या मागणीसाठी धनगर आरक्षण समन्वय समितीच्या वतीने राज्यातील 9 आंदोलकांनी 9 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.