नाशिक : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या एका महाविद्यालयातील ही घटना आहे.  प्रवीण सूर्यवंशी आणि सचिन सोनवणे अशी या दोन प्राध्यापकांची नावं आहेत.


नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्राध्याप्रकांना काल रात्री पोलिसांनी अटक केली.


पीडित विद्यार्थिनी बारावीत शिक्षण घेत आहे. बारावीमध्ये ती तीनवेळा नापास झाली आहे. त्यामुळे पास करण्याच्या बदल्यात शरीरसुखाच्या मागणीचा प्रस्ताव दोन्ही प्राध्यापकांनी तिच्याकडे ठेवला होता. तसेच अनेकदा त्यांनी तिची छेडही काढली होती.


विद्यार्थिनीला दिलेल्या प्रस्तावाबद्दल काल या प्राध्यापकांनी तिला पुन्हा विचारणा केली. मात्र विद्यार्थिनीने सगळा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.


मात्र विद्यार्थिनीने केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसून असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं कॉलेजच्या प्राचार्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.