चांदा ते बांदा... पाचशे-हजाराच्या नोटा रद्द झाल्याने अनेकांचा वांदा
एबीपी माझा वेब टीम | 09 Nov 2016 05:07 PM (IST)
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे अनेकांनी गैरसोय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुणे : पाचशे-हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर पुण्यात अनोखी उदाहरणं पाहायला मिळत आहेत. ट्राफिक पोलिसांनी पकडलं की वाहनचालक पाचशे हजारांच्या नोटा काढतात. पोलीस म्हणतात या नोटा चालत नाहीत तर चालक म्हणतात, की दंड घ्याच. एरवी दंड म्हटला की पुणेकर पोलिसांशी हुज्जत घालतात, पण आता मात्र पुणेकर म्हणतात दंड घ्याच. नाशिक : नाशिकमधल्या एका अवलिया हॉटेलचालकानं 'सुटे पैसे नसले तरी पोटभर जेवण करा, पैसे नंतर आणुन द्या' म्हणुन हॉटेलमध्ये बोर्डच लावला. साहजिकच सुट्टे पैसे नसल्यानं जेवणाची भ्रांत झालेल्या अनेकांना हायसं झालं. शिर्डी : सुट्ट्या पैशांच्या अभावामुळे साईभक्तांना मोफत जेवण मिळणार आहे. हजार, पाचशेच्या नोटा बंद झाल्याने भक्तांची अडचण टाळण्यासाठी संस्थानने हा निर्णय घेतला आहे. दर्शनरांगेत चहा, नाष्टा, लाडू, प्रसादाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थानकडून भक्तनिवासातही भक्तांची अडचण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर डोनेशन काऊंटरवर हजार, पाचशेच्या नोटा घेणे बंद करण्यात आलं आहे. कोल्हापूर : कोल्हापूरातील मार्केट यार्ड मधील व्यापार पेठ आज सकाळी 5 वाजता सुरु झाली. दररोज गुण्यागोविंदाने व्यवहार करणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवरुन वाद सुरु झाले. सांगली : व्यापारी वर्गाने ग्राहकाकडून पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारणं बंद केलं आहे. ओळखीच्या व्यक्तींना उधार दिले जात आहेत, मात्र परत करताना पाचशे-हजारच्या नोटा देऊ नका अशी विनवणी केली जात आहे. पंढरपूर : देशातील काळा पैशावर आळा बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या. मात्र या निर्णयाचा मोठा फटका पंढरपूरमधील कार्तिकी यात्रेला आलेल्या भाविकांना बसला आहे. यात्रेसाठी आलेल्या हजारो भाविकांच्या खिशात हजारो रुपये असूनही तहान आणि भुकेमुळे त्यांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. कार्तिकी यात्रा सोहळ्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक वगैरे भागातून आज नवमी दिवशी चार लाखांपेक्षा जास्त भाविक शहरात दाखल झाले आहेत. मात्र एटीएममधून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाच असल्याने सकाळपासून त्यांना एक कप चहासाठी देखील झगडावं लागत आहे. यामुळे वृद्ध आणि लहान मुलांचे फार हाल होत आहेत. चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील छोटे व्यावसायिक चांगलेच हैराण झाले आहेत. आपल्या जवळील हजार-पाचशेच्या खपवण्यासाठी नागरिक किराणा दुकानात 50-100 रुपयांचं सामान घेत आहेत. त्यामुळे चिल्लरसाठी मोठी घासाघीस सुरु आहे. हाच प्रकार पेट्रोल पंपावरही पाहायला मिळत आहे. त्यामुळे पेट्रोल टाकायचं असेल तर चिल्लर पैसे द्या किंवा 500 आणि 1000 रुपयाचे पेट्रोल भरा असा कारभार सुरु झाला आहे. रायगड : दुकानदारांकडील सुट्टे पैसे संपल्याने त्यांनी उधारी देण्याचा मार्ग अवलंबला आहे. तर काही दुकानदारांनी सुट्टे पैसे नसल्याने मोबाईलचे बिल घेण्यासही नकार दिल्याने अनेकांचे मोबाईल फोन्स बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर पेट्रोल पंपावर सुट्टे पैसे नसल्यास 500 आणि एक हजार रुपयांचे पेट्रोल घेण्याची सक्ती करण्यात आली. रत्नागिरी : रत्नागिरीच्या गणपतीपुळेचा समुद्र किनारा नेहमीप्रमाणे पर्यटकांनी भरुन गेला होता. मात्र जागोजागी 500 आणि हजारच्या नोटा बाहेर काढणाऱ्या पर्यटकांना या नोटा रद्द झाल्याने अडचणींना सामोरं जावं लागत होतं. बहुतांश पर्यटकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी तर काहींनी गणपतीपुळेत पोहोचल्या नंतर एटीएममधून पैसे काढले होते. यामध्ये बहुतांश नोटा पाचशेच्या असल्याने आज पर्यटकांची चांगलीच अडचण झाली. गणपतीपुळे आणि रत्नागिरीतील व्यावसायिकांनी बाहेरुन आलेल्या पर्यटकांना मदतीचा हात दिला. अचानक नोटा रद्द झाल्याने पर्यटकांची होणारी अडचण लक्षात घेत गणपतीपुळेतील अनेक व्यावसायिकांनी पर्यटकांकडून पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या. मंदिरात देणगी जमा करताना भाविकांना शंभर आणि त्या आतील नोटाच वापराव्या लागत होत्या. मात्र बाजारपेठेत या नोटा उपयोगी पडतील या विचाराने अनेकांनी हात आखडता घेतला. बहुतांश पर्यटकांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागतच केले आहे. विविध लॉजवर उतरलेल्या आणि लॉज सोडणाऱ्या मंडळींना एटीएम बंद असल्याचा निश्चित फटका बसला पण हॉटेल व्यावसायिकांनाही अशा पर्यटकांकडून पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारत त्यांना सहकार्याची भूमिका घेतली.