Nagpur News : सत्तेत येण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाच्या (Vidarbha State) मुद्द्यावर लोकांकडून मतं मिळवली. मात्र सत्तेत आल्यावर या नेत्यांना वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनांचा विसर पडला आहे. त्याची आठवण करुन देण्यासाठी विदर्भ राज्य समितीच्यावतीने नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
विदर्भवाद्यांना आंदोलनाची परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी आंदोलन ऐकण्याच्या तयारीत नसल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या गुवाहाटीला असल्याने त्यांची भेट आंदोलकांना घेता आली नाही.
सत्ता मिळविण्यासाठी नेत्यांकडून वेगळ्या विदर्भाच्या नावावर जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. आम्ही सत्तेत आलो तर वेगळा विदर्भ राज्य तयार करु असे आश्वासनही नेत्यांनी दिले होते. या आश्वासन देणाऱ्या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही समावेश होता. आपल्या विसर पडलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी विदर्भ राज्य समितीच्यावतीने विदर्भातील खासदारांच्या कार्यालय आणि घरांवर आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.
आक्रमक आंदोलकांना समजूत घालण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यावर आंदोलकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला. घोषणा देऊन थकलेल्या आंदोलकांना नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पाण्याची व्यवस्था केली. मात्र, पाणी पिल्यानंतर परत विदर्भवादी आंदोलकांनी नितीन गडकरी यांच्या विरोधात पायरीवर बसून घोषणाबाजी केली.
विदर्भासाठी आशिष देशमुख यांनीही उघडला मोर्चा
विदर्भाच्या मागासलेपणामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात असल्याचे कॉंग्रेस नेते आशिष देशमुख हे वारंवार सांगत असतात. शिवाय नाणारसारखे रिफायनरी प्रकल्प विदर्भात आले तर विदर्भाचा सर्वार्थाने विकास होईल आणि काही वर्षांमध्येच विदर्भातील मागासलेपणा दूर होण्यास मदत होईल. या मुद्द्यावर आपण विदर्भवादीयांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करू. या रिफायनरीचा विदर्भाच्या विकासात काय फायदा होईल? हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. रिफायनरी प्रकल्प विदर्भाला देण्यासाठी विदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांनी जोर लावण्याची गरज आहे. शिवाय या प्रकल्पासाठी सर्वांनीच राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे, असेही देशमुख यावेळी म्हणाले होते.
प्रशांत किशोर यांच्या चमूकडून पाहणी
याशिवाय आशिष देशमुख यांनी देशाच्या राजकारणातील यशस्वी रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) आणि त्यांची टीमने वेगळ्या विदर्भ राज्यासाठी (seperate vidarbha state) खास व्यूह रचना आखून घेतली. यामध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांत जाऊन तेथील आर्थिक भौगोलिक, नैसर्गिक संपदा आणि राजकीय स्थितीचा अभ्यास प्रशांत किशोर यांच्या चमूने केला होता. वेगळ्या राज्यासाठी विदर्भाची स्थितीबाबत सखोल चर्चा विदर्भवाद्यांशी करण्यात आली होती. मात्र काही विदर्भवाद्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला होता.
हेही वाचा