मुंबई : दरवर्षी अनेक जण गणेशोत्सवादरम्यान जेव्हा कोकणात किंवा आपआपल्या गावी जायला निघतात. तेव्हा खरं तर बस आणि रेल्वेवर दरवर्षी ताण येतो. म्हणून यावर्षी कोकणासाठी व राज्यातील इतर काही भागात जादाच्या बस आणि रेल्वे सोडण्यात आल्या. तरीही बुकिंग फुल असल्याने प्रवाशांना आता खासगी बसचा पर्याय निवडावा लागतो आहे.

आता याच संधीचा फायदा घेऊन खासगी बस प्रवाशांना जादाचे भाडे लावत असल्याने एकप्रकारे प्रवाशांची ऐन सणासुदीच्या काळात खिशाला कात्री लागत आहे.

खरं तर गणेशउत्सवात मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जास्त आहे. त्यामुळे जादाचे बस, रेल्वेचं तिकीट अनेकांना मिळत नाही. यावर पर्याय म्हणून अनेक प्रवासी जास्तीचे पैसे भरून खासगी बसने जायचं ठरवत आहेत. या सगळ्यांमध्ये 30 ते 40 % जास्त पैसे खासगी बसवाल्यांकडून घेण्यात येत आहेत.

खासगी बसचे दर किती वाढले आहेत?

  • मुंबई ते रत्नागिरी - एसी - 1600 ते 1800 नॉन एसी - 800 ते 1000 रुपये

  • मुंबई ते सावंततवाडी - एसी (स्लीपर) -1800 ते 2000 नॉन एसी (सिटिंग)- 1000 ते 1200 रुपये

  • मुंबई ते चिपळूण - एसी - 1300 ते 1500 नॉन एसी - 800 ते 1000 रुपये

  • मुंबई ते कणकवली - एसी -1600 ते 1800 नॉन एसी - 1000 ते 1200 रुपये

  • मुंबई ते गोवा - एसी - 2300 ते 2500 नॉन एसी - 1300 ते 1500 रुपये


याचसोबत पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात जाण्यासाठीही 20 ते 30 % जादाचे भाडे या खासगी बसवाल्यांनी लावले आहेत. गणेशोत्सवच्या काळात ट्राफिक, तसेच परत येणाऱ्या रिकाम्या गाड्या आणि गाड्यांना लागणारे डिझेल याची भरपाई भरून काढण्यासाठी ही भाववाढ केल्याचं खासगी बसच्या मालकांचे म्हणणे आहे. परंतु, ज्यांचं गावाला जायचं नियोजन अचानक झालं, अशा प्रवशांना मात्र खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

खरं तर न्यायालयाने सरकारला या खासगी बसच्या या ऐन सणासुदीच्या वेळी वाढवण्यात येणाऱ्या दरांवर लगाम लावावा, असं सांगण्यात आलं होत. मात्र, सरकारकडूनही अद्याप असं नियंत्रण लावता आलं नाही.