मुंबई : शाळा महाविद्यालयांना नाताळची सुट्टी पडली असतानाच डिसेंबर महिन्याच्या शेवटी सलग पाच दिवस सुट्टी आली आहे. या सलग आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. खाजगी बस वाहतूकदारांनी त्यांच्या दरात 30 ते 50 टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे.

नाताळची सुट्टी लागली की मुंबईकर गोवा, महाबळेश्वर, बैंगलोर, कोकण यांसारख्या ठिकाणांना पसंती देतात. पण सुट्ट्यांचा मुहूर्त साधून अव्वाच्या सव्वा भाव खासगी प्रवासी बस वाहतुकदारांकडून वाढवण्यात आले आहेत. ही भाडेवाढ सात जानेवारीपर्यंत लागू असणार आहे.

सातारा कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर, सांगली येथे जाणाऱ्या बस गाडय़ांच्या भाडय़ातही 200 ते 400 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर मुंबईतून राज्यातील अन्य मार्गावर जाणाऱ्या बस गाडय़ांच्या भाडय़ातही वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

खासगी बसची भाडेवाढ कशाप्रकारे आहे?

मुंबई ते गोवा

बिगरवातानुकूलित आसन : 1000-1200 रुपयांपर्यंत

वातानुकूलित स्लीपर : 2000-3000 रुपयांपर्यंत

मुंबई ते कणकवली

बिगरवातानुकूलित आसन : 800-1000 रुपयांपर्यंत

वातानुकूलित स्लीपर : 2000-2500 रुपयांपर्यंत

मुंबई ते महाबळेश्वर

बिगरवातानुकूलित आसन : 700-900 रुपयांपर्यंत

वातानुकूलित स्लीपर : 1000-1500 रुपयांपर्यंत

मुंबई ते नागपूर

बिगरवातानुकूलित आसन : 1500-1800 रुपयांपर्यंत

वातानुकूलित स्लीपर : 2700-2900 रुपयांपर्यंत

मुंबई ते बेंगलोर

बिगरवातानुकूलित आसन : 1600-1800 रुपयांपर्यंत

वातानुकूलित स्लीपर : 2300-3000 रुपयांपर्यंत

खासगी बसच्या भाड्यात केलेली वाढ ही शासनाने आखून दिलेल्या नियमानुसारच करण्यात आली असल्याचे मुंबई बस मालक संघटनेचे असे म्हणणे आहे. तसेच ऑफ सिझनचा लॉस भरून काढण्यासाठी सुट्टीच्या दिवसांत ही भाववाढ करण्यात आली आहे. या काळीत जादा गाड्या हायर कराव्या लागतात त्यामुळेच 7 जानेवारी पर्यंत ही भाववाढ असणार असून त्यानंतर दर पूर्वपदावर येतील.

खासगी बसची भाडेवाढ, रेल्वे गाडय़ांना असलेली प्रतीक्षा यांमुळे नाताळ आणि न्यू इअरट्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईबाहेर जाणाऱ्यां लोकांना मात्र यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.