मुंबई : संविधान हे पवित्र असून तो आपल्या प्रजासत्ताकाचा पायाभूत कायदा आहे. त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत हे दुर्दैवी आहे अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. राहुल गांधींच्या हाती असलेल्या ज्या लाल संविधानाचा फडणवीसांनी उल्लेख केला तेच संविधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट दिली होती. याबाबत फडणवीस यांचे काय मत आहे? असा सवालही त्यांनी विचारला.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये डाव्या विचारांच्या अनेक संघटना सामील झाल्या होत्या, त्यांची ध्येयधोरणं अराजकता पसरवण्याची आहेत. राहुल गांधी लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देतात असा सवाल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींच्या हाती असलेले संविधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींना भेट दिलं होतं. याबाबत फडणवीस यांचं मत काय आहे असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
"संविधान हे पवित्र असून तो आपल्या प्रजासत्ताकाचा पायाभूत कायदा आहे. त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत हे दुर्दैवी आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकांकडे संविधान असले पाहिजे. या उद्देशाने राहूल गांधीं संविधानची प्रभावीपणे जनजागृती करीत आहेत. ह्याच पॉकेट संविधानाची एक प्रत स्वत: प्रधानमंत्री मोदी यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट दिली होती. याबाबत फडणवीस यांचे काय मत आहे?"
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
कोल्हापूरमधील सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, "भारत जोडा असा समूह करण्यात आला आहे ज्यामध्ये अनेक संघटना सामील झाल्या आहेत. ज्या संघटना अतिशय डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे पाहता ती अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे. राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी? लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहेत? तुम्ही या माध्यमातून अराजकता पसरवत आहात. भारत जोडोच्या माध्यमातून अराजकता पसरवली जात आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही."
ही बातमी वाचा: