Prithviraj Chavan: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील सावळा गोंधळावरून माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. पुढील 15-16 दिवस गोडाऊनला पेठ्या ठेवल्या जातील आणि सरकारला घालमेल करायची असेल, तर केली जाईल असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की भाजप सरकारने 73 आणि 74 व्या घटनात्मक अधिकाराला पायदळी तुडवल्याचा आरोप त्यांनी केला. या देशांमध्ये लोकशाही नाहीतर हुकूमशाही येईल असेही ते म्हणाले. निकाल पुढे ढकलल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त करतानाच ही शंभर टक्के सरकारची चूक असल्याचे त्यांनी सांगितले.
आयोग भाजपचा असल्याचा आरोप
राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचा प्रचार संपत असताना, मतदानाच्या केवळ एक दिवस आधी काही नगरपालिकांमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. या निर्णयावरून राज्यात मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहेत. चव्हाण म्हणाले की, “निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळाला सरकारच जबाबदार आहे.” गेली पाच वर्षे राज्यात नोकरशाहीचे राज्य आहे, आणि अचानक 20 नगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाण्यामागे सरकारचा हस्तक्षेप असल्याचा आरोपही त्यांनी केला. आयोग भाजपचा असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, कितीही आंदोलने झाली, किंवा राहुल गांधीनी कितीही आवाज उठवला, तरी काहीही बदल होणार नाही.
देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होण्याची शक्यता
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय राजकारणाचा उल्लेख करताना चव्हाण यांनी एक मोठा दावा केला. “देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होण्याची शक्यता आहे,” असे ते म्हणाले. एपस्टाईन फाईल्समुळे अमेरिकेत गेल्या सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या गदारोळाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्या फाईल्स सार्वजनिक झाल्यास त्याचा भारताच्या राजकारणावरही मोठा परिणाम होऊ शकतो. चव्हाण म्हणाले, “जेफ्री एपस्टाईन नावाच्या अमेरिकन उद्योगपतीने अनेक बेकायदेशीर कृत्ये केली आणि अनेक देशांतील मोठ्या नेत्यांना त्यात ओढलं. त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव आहे. संसदेने ट्रम्प यांच्यामागे सतत पाठपुरावा केला असून जवळपास 10 हजार कागदपत्रे त्यांच्या ताब्यात आहेत. ही कागदपत्रे उघड झाल्यास ट्रम्प यांना राजीनामा द्यावा लागू शकतो.” सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत व्हिडिओ प्रसिद्ध केल्याची माहितीही त्यांनी दिली. “पुढील महिनाभरात मोठे राजकीय बदल घडू शकतात. मी फक्त एवढेच म्हटले की मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. त्याचा अर्थ ज्याने त्याने लावावा,” असे चव्हाण म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या