नंदुरबार : राज्यातले अनेक भाजप नेते आमच्या संपर्कात आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्याचसोबत, भाजपचा राज्यातील प्रभाव कमी होत चालल्याने आपण भाजपमध्ये जाऊन चूक केल्याची भावना अनेक नेते व्यक्त करत असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.


काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी जाहीररित्या एकनाथ खडसे यांना ऑफर दिली होती. यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाणांना विचारलं असता ते म्हणाले, खडसेंच्या ऑफरबद्दल पक्षश्रेष्ठींनाच विचारा.

“देशात अल्पसंख्याक आणि दलितांवर अत्याचार सुरु आहे. म्हणूनच आम्हाला संविधान बचावचा नारा द्यावा लागला. लोकांच्या सरकारबाबतच्या आशा फोल झाल्या आहेत. संविधान टिकतं की नाही आणि पुढील निवडणुका लोकशाही पद्धतीने होतात की नाही, याची भीती असल्यानेच संविधान बचावचा नारा देण्याची आम्हाला वेळ आली आहे.”, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी संविधान बचाव रॅलीसंदर्भात मांडली.

“आपण मंत्रालयात आत्महत्येचा पयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांचा भेट घेतली आहे. सरकार दरबारी सर्व दरजावे बंद होत असल्याने शेतकरी असल्या प्रकारची पावले उचलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जातीने या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे. दलाल तुपाशी आणि शेतकरी उपाशी असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यास पुढच्या अनेक प्रकल्पांना शेतकरी जमीन देणार नाहीत.”, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.