मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच आज काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ओबीसी आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसी राजकीय आरक्षणाचा ठराव मांडला होता. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी काही आरोप केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चुकीच्या माहितीच्या आधारावर वक्तव्य केली होती. फडणवीसांनी जेवढ्या त्रुटी सांगितल्या तेवढ्या प्रत्यक्षात नाहीत. ओबीसी राजकीय आरक्षण देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. केंद्र सरकारनं माहिती द्यावी, अशी अनेकांनी मागणी केली आहे." 


पृथ्वीराज चव्हाण बोलताना म्हणाले की, "आपल्याकडे डेटा असताना इम्पेरियाल डेटाची गरज नाही. ग्रामीण विकास मंत्रालायने ही आकडेवारी दिली आहे. 1 कोटी 37 लाख त्रुटी आहेत, त्या चुका नाहीत. यासंदर्भात कोणी माहिती दिली नाही म्हणून त्या त्रुटी आहेत." पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, "2014 रोजी शिवसेना आघाडी सोबत येणार होती, यावर आता मी काही फार बोलणार नाही. मी काही दिवसांपूर्वी यावर बोललो होतो. मात्र त्यावेळी तशी वेळ होती. हे सर्वांनाच माहीत आहे की, त्यावेळी काय परिस्थिती होती." सध्या मंत्रिमंडळातील काँग्रेस मंत्र्यांच्या बदलीबाबत अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही. या फक्त अफवा आहेत. कदाचित इच्छुक मंत्र्यांनी हे केलं असावं, असं पृथ्वीराज चव्हाण बोलताना म्हणाले. 


काही दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच काँग्रेसकडून सातत्यानं दिल्या जाणाऱ्या स्वबळाच्या नाऱ्यामुळेही महाविकास आघाडीत अंतर्गत धूसफूस सुरु झाली आहे. अशातच स्वबळाचा नारा दिला त्यात कोणाला नाराज होण्याची गरज नाही. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याची संधी आहे. त्याप्रमाणे नाना पटोले काम करत आहेत. सरकारमध्ये बाळासाहेब थोरात काम करत आहेत.", असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीत काहीही वाद नाही. त्यामुळे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल.