नांदेड : जिल्ह्यातील घोडजच्या कामेश्वर वाघमारे या शाळकरी मुलाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. शासनाकडून दिला जाणारा हा पुरस्कार 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ऑनलाइन कामेश्वरला देण्यात येणार आहे. कंधार तालुक्यातील घोडज गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण कामेश्वर वाघमारे या आठवीत शिकणाऱ्या मुलाने वाचवले होते. त्याच्या याच शौर्यासाठी त्याला शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


आपल्या जीवाची पर्वा न करता कामेश्वरने नदीतच्या पाण्यात उडी घेऊन बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण वाचवले. गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात दुपारच्या वेळेत तीन बालक बुडत असतांना कामेश्वरने पाहिलं. पाहताच क्षणी पाण्यात उडी घेऊन त्याने जिवाच्या अकांताने दोघांना बाहेर काढले. परंतु एका मुलाला वाचवण्यात तो अयशस्वी राहिला, त्याला न वाचवू शकल्याची खंत मात्र कामेश्वरच्या मनात सदैव असल्याचं त्यानं सांगितलं. शासनाकडून दिला जाणारा प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार कामेश्वर वाघमारे याला मिळावा यासाठी कंधार लोहा मतदारसंघाचे आमदार आणि माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून यावर्षीचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार कामेश्वरला जाहीर झाला आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचविण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. कंधार तालुक्यातील घोडज येथे या वर्षीच्या पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन बालकांचे प्राण इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कामेश्वर वाघमारे याने वाचविले होते.


कामेश्वर वाघमारे याच्या या शौर्याचं कंधार लोहा मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी कौतुक केलं. एवढंच नाही तर शासनस्तरावर कामेश्वर वाघमारे याचा सन्मान व्हावा यासाठी स्वतः आमदार शामसुंदर शिंदे यांनी पाठपुरावा केला. कंधारच्या तहसीलदारापासून ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत आणि दिल्लीच्या संसदेपर्यंतही आमदार शामसुंदर शिंदे यांनी पाठपुरावा करत बालवीर रामेश्वर वाघमारे यास राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले. काल केंद्र सरकारच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या बाल शौर्य पुरस्काराच्या यादीत महाराष्ट्रातील पाच बालकांना पंतप्रधान बाल शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. त्यात कामेश्वर वाघमारे याचा क्रमांक पहिला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील घोडज येथील मागासवर्गीय समाजातील या बालकाचा राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मान होत असल्याने आपणास अत्यंत आनंद होत असल्याची माहिती आमदार शामसुंदर शिंदे यांनी दिली आहे.