मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यवतमाळ आणि धुळे जिल्ह्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी पांढरकवडा येथे बचतगटाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. जिल्ह्यात महिला बचतगटाचे मोठे जाळे असून 17 हजार पेक्षा जास्त बचत गट चांगले कार्य करत आहेत. या सर्व महिलांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पांढरकवडा येथे येणार आहेत. सकाळी 10 .30 वाजता महिला बचत गटाच्या मेळाव्यासाठी ते येणार असून येथे सभा सुद्धा घेणार आहे.
तर दुपारी 1 वाजता नियोजित कार्यक्रमानुसार धुळ्याला ते येतील. त्यांच्या हस्ते मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्ग, सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना, अक्कलपाडा धरण ते धुळे शहर पाईपलाईन योजनांचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येईल, तसेच नियोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीसंबोधित करणार आहेत. यावेळी मोदींसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे देखील उपस्थित राहतील.