Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली यंदाचे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद  ( Ramnath Kovind) उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींना साहित्य संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार  (Sharad Pawar)  यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह लातूरमधील सर्व पक्षांच्या आमदार आणि खासदार या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत. 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी लातूर येथे हे साहित्य संमेलन होणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमावर्ती भागात हे संमेलन होत आहे.  


लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आज साहित्य संमेलनाच्या नियोजनाविषयी माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेत साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संजय बनसोडे, भाजप खासदार सुधाकर श्रींगारे, भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर,  भाजप आमदार अभिमन्यू पवार, भाजप आमदार रमेश कराड, शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे,  लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 


कोरोना महामारीनंतर होणाऱ्या या साहित्य संमेलनात सर्वच पक्षांनी फक्त लक्षच घातले नाहीतर प्रत्यक्ष सहभाग ही घेतला आहे. इतर वेळी राजकीय आरोप प्रत्यारोप करताना टोकाच्या भाषेचा वापर करणारे विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी एकत्र आलेले पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.  
         
लातूर येथील उदगीरच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालया हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. तयारीसाठी कमी वेळ मिळाला असला तरी मिळालेल्या वेळेत युद्ध स्तरावर तयारी सुरू आहे. देशभरातील 1000 पेक्षा जास्त मराठी साहित्यिक आणि कविंना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांची उदगीर, लातूर, बिदर आणि नांदेड येथे राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.  


36 एकरात मंडप 
एप्रिल महिन्यातील उन्हाळा आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेत मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास 36 एकर परिसरात मंडप उभारण्यात येत आहे. त्यामध्ये विविध सभागृह आणि पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मुख्य मंडपात 5000 लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.  
    
यंदाच्या साहित्य संमेलनाला साहित्यिक आणि राजकारण्यांबरोबरच कलावंताची हजेरी असणार आहे. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयच्या प्रांगणात साहित्य संमेलनाचे आयोजन होणार आहे. यावेळी या संस्थेचा हिरक महोत्सवही होणार आहे. त्यानिमित्ताने  20 एप्रिल रोजी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचा लाईव्ह कार्यक्रम असणार आहे.  21 तारखेला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha