Uddhav Thackeray : मराठी माणसाला, हिंदुत्वाला तोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वात काय फरक आहे? दोन शब्दात सांगायचा झाला तर शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते, भाजप राजकारणाठी हिंदुत्वाचा वापर करते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील शिवडी येथील शिवसेना शाखेचं उद्घघाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अरविंद सावंत, सुभाष देसाई, सचिन अहिर, किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.   


गेले त्यांचं वर्णन काय करायचं ? कृपा करून आम्हाला गद्दार म्हणू नका म्हणतात. तुम्ही स्वतःहून कपाळावर लिहून घेतलंय गद्दार. जिथे शिवसैनिक असतो, तिथे सत्ता येते. माझ्या आजूबाजूला खासदार-आमदार आहेत. गेलेत ते निवडून येऊ शकतात का ?, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  


2019 साली भाजपसोबत करार ठरले होते, त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली. भाजप बहुमत आलं, नकोय ते मंत्री पद केंद्रात दिलं. 5-6 महिन्यात विधानसभा निबंडणूक झाली, आज म्हणतात मुख्यमंत्री आम्ही केलं, मग अडीच वर्षापूर्वी नाही केलं. आज मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्री केलं, हे अडीच वर्षापूर्वी केलं असतं तर भाजपच्या दगडाला शेंदूर लागला असता. अडीच वर्षे ठरला होता, मग तेव्हा संभवही नाही म्हणत होते, मग आज कसं संभव झालं ?


आता पुन्हा एकदा समान्यातून असामान्य घडवायचं आहे. कोणत्या शक्तीशी पंगा घेतलाय त्यांना ठाऊक नाही. शिवसेनेने या दगडाला शेंदूर फासला होता, ते गिळायला बसलेत. त्यांच्या मागे महाशक्ती आहे, महाशक्ती कळसूत्री आहे, त्यांना शिवसेना संपवाची आहे. ज्या वेळी संकट आली, त्याला गाडून सेना जोमाने उभी राहिलीय. या अनेकदा आधी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला, आता शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या गद्दारांना कुठल्या ना कुठल्या पक्षात जाण्याखेरीज पर्याय नाही, काल एका पक्षाने त्यांना ऑफर दिलीय, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


 त्यांना शिवसेना संपवायची आहे, ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडायचं आहे,  पण ठाकरे आणि शिवसेना नातं घट्ट राहणार आहे. तुमच्यात मर्दपणा असेल तर माझ्या वडिलांचा फोटो लावू नका , हिंमत असेल तर स्वतःच्या नावावर निवडून येऊन दाखवा. ज्यांचे ज्यांचे आई वडील आहेत, त्यांनी स्वतःच्या आई वडिलांना घेऊन महाराष्ट्रात मते मागा. पक्ष घेण्याचा प्रयत्न केलाय, आता वडीलही घ्यायला चाललेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 


प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं शपथपत्र मला हवंय, सदस्य नोंदणी हवीय. दोन्ही हातात सदस्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे हवेत. वाढदिवसाला मला भेट द्यायची, असेल तर फुलांचे गुच्छ नकोत, सदस्यांच्या अर्जाचे आणि शपथपत्रांचे गठ्ठे भेट हवेत. त्यांच्याकडे निष्ठावान नकोय, बिकाऊ गेलेत. त्यांनी प्रोफेशनल लोक आहेत, ही लढाई पैसे विरुद्ध निष्ठ आहे. पैसे कितीही ओता, माझं वैभव घेऊ शकणार नाहीत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय. 


लवकरच बाप्पा येतायत, मी साकडं घालतो, यंदा आपण वारी पंढरीची सुरू केली, हे आलेलं संकट अरिष्ट तोडून शिवसेनेचा भगवा तेजाने, महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानात फडकू दे. मराठी माणसाला, हिंदुत्वाला तोडण्यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहेत. तुमचं आणि भाजपचे हिंदुत्व काय ? शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते, भाजप राजकारणाठी हिंदुत्वाचा वापर करते. एखादा मुख्यमंत्री पायउतार होतो, तेव्हा लोक हळहळतात, हे तुमच्यामुळे. वर्षा सोडलं, राजकीयदृष्ट्या शक्तिमान होतो, पण मातोश्रीवर आल्यावर माझी मूळ शक्ती मला मिळाली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.