उस्मानाबाद : येत्या काही दिवसात कोरोनावर लस उपलब्ध होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य पातळीवर लस वाटप कशी करायची याची तयारी सुरु झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे देखील गेल्या काही दिवसांपासून तुलनेनं कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात लस आली तर त्यासाठी शीत साखळी कुठे आहे? प्राथमिक आरोग्य केंद्र किती आहेत? ग्रामीण रुग्णालय किती? उपजिल्हा रुग्णालयात लस देणाऱ्या व्यक्तीचे नाव काय? मोबाईल क्रमांक काय? पर्यवेक्षक कोण असेल ? लस देण्याचे ठिकाण कुठलं असेल? त्याचा पिन कोड नंबर काय? ही सगळी माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे.
काही दिवसात कोरोनावर लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लस साठा आणि शीत साखळीची माहिती संकलित करण्याचे आदेश माता बाल संगोपन व शालेय आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोग्य विभागाच्या या पूर्वतयारीच्या आदेशामुळे लवकरच लस उपलब्ध होईल असा आशेचा किरण दिसू लागला आहे.
मागच्या सात महिन्यापासून देशभरात कोरोना धुमाकूळ घालतोय. पण त्याला अटकाव करण्यासाठीची लस अद्याप तयार झालेली नाही. परंतु हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
त्यामुळे लसीचा पुरवठा करायचा असेल तर त्यासाठी तयारी करावी लागेल म्हणून आरोग्य विभागानं किती प्रमाणात लस लागणार, याविषयीची माहिती संकलित करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात पुण्याच्या राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालकांनी 8 ऑक्टोबरला जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रातून कोरोना लस लागणाऱ्या संभाव्य साठ्याची माहिती मागवली आहे. लस साठा आणि शीतसाखळी व्यवस्थापनासाठी पूर्वनियोजन करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार नियोजन करण्यासाठी 16 ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक आरोग्य परिचारकांच्या माध्यमातून ही सगळी माहिती जमा केली जात आहे.
यासंदर्भात केंद्र सरकारने राज्याला पत्र दिले आहे. त्यानुसार ही तयारी सुरू झाली आहे. सुत्रांच्या माहितनुसार जी लस उपलब्ध होईल ती पहिल्या टप्प्यात फक्त शासकीय स्तरावर असेल. मेडिकल सेक्टर मध्ये दिली जाईल. नंतर खाजगी पातळींवर उपलब्ध करण्याबाबत निर्णय होणार आहे.
नेमकी काय माहिती मागवली
प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या
ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य रुग्णालयात येणाऱ्या व्यक्तींचे नाव मोबाईल क्रमांक
पर्यवेक्षिकांची नाव
लस देण्याचे ठिकाण
त्याचा पिन कोड नंबर
महत्त्वाचं म्हणजे नेमकी किती लस लागणार आहेत