सोलापूर : दलित चळवळ आणि दलित साहित्यानं नुकसान केलं आहे. दलित चळवळ आणि दलित साहित्यामुळे जातीभेद कायम राहिला असून यामुळेच मी दलित चळवळ आणि दलित साहित्य दोन्हीही मानत नाही, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी दिली आहे.
वातावरण आज नाही आधीपासूनच दूषित आहे. सध्या प्रश्न सोडवण्याऐवजी गुंता वाढवण्याकडे सगळ्यांचा भर आहे. मी कोणताही इझम मानत नाही असे सांगत मी माझ्या भाषणामध्ये मी कोणावरही टीका करणार नाही, असेही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर धरसोड वृत्तीचे , आंबेडकरांचे नातू यापुढे त्यांची ओळख नाही
प्रकाश आंबेडकर हे धरसोड वृत्तीचे आहेत. आंबेडकरांचे नातू यापुढे त्यांची ओळख नाही. आंबेडकरांचे विचार प्रकाश आंबेडकरांनी सोडून दिले आहेत, अशी टीका अखिल भारतीय मराठी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही टीका केली. संधी साधू नेता असल्याचे केंद्रात मंत्रिपद मिळवणे म्हणजे बाबासाहेबांचा विचार नव्हे, असे गज्वी म्हणाले. नरेंद्र मोदी हे धाडसी नेते आहेत. ते निर्णय घेतात आणि तोंडावर पडतात असेही गज्वी म्हणाले. तर नितीन गडकरी धाडसी आणि कष्टाळू नेता असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नेता म्हणून कस लागलेला नाही, असेही ते म्हणाले.
99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे 22 फेब्रुवारीला नागपुरमध्ये उद्घाटन होणार आहे. याची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते उद्घाटन होईल. नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित असतील. समारोप 24 फेब्रुवारीला सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.