अहमदनगर : मान्सूनपूर्व पावसाने अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. या पावसात पारनेरमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखणी झाले आहेत. शिवाय अनेक ठिकाणी मोठं नुकसानही झालं.


बाबुर्डी, पाथर्डी, श्रीगोंद्यात लोणी परिसरात पावसाने हजेरी लावली. मात्र वादळी वाऱ्याने जिल्ह्यात हाहाकार उडवला. पारनेरला वीज पडून एकाचा बळी गेला असून दोघं जण जखमी झाले आहेत.

टाकळी ढोकेश्वरला वीज पडून 23 वर्षीय गोकुळ वाघचा जागीत मृत्यू झाला. विद्यालयाच्या मैदानात खेळताना वीज पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेक ठिकाणी जनावरांचाही बळी गेला आहे.

तर अरणगावला सोसाट्याच्या वाऱ्याने धुमाकूळ घातला. अनेक घरांचे पत्रे वाऱ्याने उडाल्यानं नागरिकांची गैरसोय झाली.

अहमदनगर-दौंड आणि भिंगार रस्त्यावर मोठं झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. शहरात चौपाटी कारंजा परिसरात फ्लेक्समुळे पथदिव्याचा खांब विद्युत वाहक तारेवर पडला. विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. काही ठिकाणी फळबागांनाही वादळाचा फटका बसला.