मुंबई : राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात कुठे रिमझिम, तर कुठे मुसळधार पाऊस पडला. काही ठिकाणी काहीसा गारवा, तर काही ठिकाणी नुकसान सहन करावा लागला.


कोल्हापुरात झालेल्या तुफान पावसानं उत्तूरच्या आठवडी बाजाराचे तीन तेरा वाजले. दुपारच्या सुमारास अचानक आभाळ भरु आलं आणि अवघ्या 10 मिनिटांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. सुरुवातीला रिमझिम पडणाऱ्या पावसानं काहीच वेळात रौद्र रुप धारण केलं आणि अनेक व्यापाऱ्यांची भाजी वाहून गेली. पावसानं या बाजाराचं मोठं नुकसान झालं आहे.

चंद्रपुरातही सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसाच्या जोरदार हजेरीनं वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला असून लोकांना उकाड्यापासून दिलासा दिला आहे.

सांगली, रायगड परिसरातही पावसानं हजेरी लावली. रिमझिम पावसानं शहरात आल्हाददायक वातावरण निर्माण झालं असलं तरी अचानक आलेल्या पावसानं लोकांची चांगली तारांबळ उडाली.