मुंबई : गेल्या जवळपास महिनाभरापासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरचे अनेक फोटो समोर आले. त्यावरून वादही झाला. त्याचा आता जो फोटो समोर आलाय त्यावरून पोलिसांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.हा फोटो दुबईतला आहे. शिवरायांचा अवमान करणारा कोरटकर पोलिसांच्या हातावर तुरी दुबईला पळाला की जुने फोटो टाकून पोलिसांची दिशाभूल करतोय अशी चर्चा सुरू झाली आहे. फोटो पोस्ट करणारा, हॉटेलमध्ये मुक्काम करणारा, कोरटकर पोलिसांना कसा सापडत नाही, यावर आश्चर्य व्यक्त केलं जातंय. मुख्यमंत्र्यांनी ज्याला चिल्लर म्हटलं होतं तोच पोलिसांना शोधूनही सापडत नाही.
शिवरायांचा अवमान करणारा, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी देणारा फरार प्रशांत कोरटकर आहे तरी कुठे असा प्रश्न विचारला जात असतानाच एक फोटो व्हायरल झाला आणि तो दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरू झाली.
कोरटकरचे दुबईचे फोटो जुनेच
कोरटकर देश सोडून पळाल्याच्या बातमीनं पोलfस खडबडून जागे झाले. प्रशांत कोरटकरविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली. पण तो दुबईला गेला नसून हा फोटो 2023 मधला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पासपोर्ट जप्त केला असून नागपूर, चंद्रपूर, मुंबईत कोरटकरचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांच्या भूमिकेवर संशय
गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरटकर चंद्रपूरमधल्या एका हॉटेलात थांबला होता. त्या हॉटेलपासून पोलिस स्टेशन अवघ्या शंभर मीटर अंतरावर आहे. या प्रकरणाचा घटनाक्रम पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण करणारा ठरतोय.
कोरटकर प्रकरणाचा घटनाक्रम काय?
24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजून 8 मिनिटांनी कोरटकरने इंद्रजित सावंतांना फोन केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंतांना धमकी दिली होती. इंद्रजित सावंतांचा नंबर त्यानं कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून मिळवल्याची माहिती आहे. 25 फेब्रुवारीला इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरून कोल्हापूरच्या राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरटकरनं 27 फेब्रुवारीला एक व्हिडीओ तयार करून माफी मागण्याचा प्रयत्न केला. 28 फेब्रुवारीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं त्याला अटकपूर्व जमीन मंजूर केला. कोल्हापूर पोलिसांनी म्हणणं मांडण्याआधीच त्याचा जामीन मंजूर झाला. कोल्हापूर पोलिसांनी त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. 18 मार्चला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला.
बड्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत मैत्रीचे संबंध
कोरटकरचे राज्याच्या पोलिस दलातील अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत मैत्रीचे संबंध आहेत. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अधिकाऱ्यांसोबतचे त्याचे फोटो त्याची साक्ष देतात. यावरून विरोधकांनी आता पोलिसांनाच टार्गेट केलं आहे. नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.
तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "प्रशांत कोरटकर सापडत नाही कारण अनेक आयपीएस अधिकाऱ्यांसोबत त्याची मैत्री आहे. तो या अधिकाऱ्यांच्या मदतीने गेस्ट हाऊसमध्ये रहायचा. कोरटकर सापडत नाही कारण तो नागपूरचा आहे. त्यामुळे त्याला पोलिस मदत करतात.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकरला सोडणार नसल्याचं पुन्हा एकदा सांगितलं आहे.
कोरटकरचे दोन्ही मोबाईल त्याने बायकोकडून पोलिसांकडे जमा केलेले असले तरी त्यातील डेटा त्याने नष्ट केला आहे. पोलिसांना तो डेटा परत मिळवावा लागेल. त्यानंतरच कोरटकर कोणाकोणाच्या संपर्कात होता आणि कोण कोण त्याला मदत करत होतं हे समजू शकणार आहे.
पोलिसांना खरंच पकडायचं आहे का?
पोलिसांना कोरटकरला खरंच पकडायचं आहे का की त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो आहोत असं भासवायचं आहे हा प्रश्न आहे. कारण महिना होत आल्यानंतर देखील तो पोलिसांना सापडलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य करणारी व्यक्ती पोलिसांना सापडत नसेल तर ही बाब पोलिसांबद्दलचा संशय आणखी बळावणारी आहे.