औरंगाबाद : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी पवारांना पाहून आपला वाढदिवस ठरवला या अजित पवार यांच्या दाव्याला प्रकाश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. शरद पवारांशी मुंडेंचा संबंध नव्हता तेव्हापासून त्यांचा वाढदिवस आम्ही 12 डिसेंबर रोजीच साजरा करायचो, असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं.


प्रकाश महाजन स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे बंधू आणि गोपीनाथ मुंडे यांचे मेहुणे आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि मी महाविद्यालयीन जीवनापासून सोबत असून 12 डिसेंबर रोजीच त्यांचा वाढदिवस साजरा करायचो, असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं.

गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे, मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असा खुलासा 'माझा कट्टा'वर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचा दाखला देत केला होता.

धनंजय मुंडेंना तरी त्यांची खरी जन्म तारीख माहिती आहे का, राहुल महाजन यांच्या आठ दिवस आधी जन्मले म्हणून त्यांनी त्यांची जन्म तारीख ठरवली, असा टोलाही प्रकाश महाजन यांनी धनंजय मुंडेंना लगावला.

मी मुंडे याना कॉलेजपासून ओळखतो. 12-12 हीच त्यांची जन्म तारीख आहे. 1980 मध्ये पवार यांची ख्याती पाठीत खंजिर खुपसणारा नेता अशी होती, त्यामुळे त्यांची जन्म तारीख ठेवण्याचा प्रश्नच येत नाही, असा घणाघातही प्रकाश महाजन यांनी केला.

दरम्यान जी व्यक्ती आरोपांना उत्तर देण्यासाठी आज आपल्यात नाही, त्यांच्यावर आरोप करणं दुर्दैवी असल्याचं प्रकाश महाजन म्हणाले. मुंडेंच्या निधनानंतरही असं विधान करणं म्हणजे त्यांची किती धास्ती आहे, हे स्पष्ट होतं, असंही ते म्हणाले.

''गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसप्रवेशाविषयी मनमोहन सिंहच सांगू शकतील''

गोपीनाथ मुंडे भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात होते. त्यांच्यासोबत पाशा पटेल, माधुरी मिसाळ, प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे असे चार-पाच आमदारही मुंडेंसोबत पक्ष सोडणार होते. मात्र मुंडे हे लोकसभेचे उपनेते होते, अशाप्रकारे पक्ष फोडायचा नसतो, असं मत व्यक्त करत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मुंडेंना पक्षात घेतलं नाही, असा दावाही अजित पवारांनी केला होता. मात्र प्रकाश महाजन यांनी हा दावाही खोडून काढला.

तत्कालीन राजकारणाची परिस्थिती आजच्यापेक्षा वेगळी होती. मुंडे काँग्रेसमध्ये जाऊ नयेत म्हणून शरद पवारांनी देव पाण्यात ठेवले होते. मुंडे यांनी या विषयावर कधीही भाष्य केलं नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाविषयी मनमोहन सिंहच खंर सांगू शकतील, असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं.

संबंधित बातमी : मनमोहन सिंहांनी मुंडेंना काँग्रेसमध्ये घेतलं नाही, अजित पवारांचा गौप्यस्फोट