अकोला : नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसेवर देशभरात केंद्र आणि भाजपवर टीका होत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करतांनाच काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप लावले आहेत. केंद्राच्या शेतकरी कायद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे निव्वळ 'नौटंकी' आणि 'तमाशा' असल्याची बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोला येथे बोलत होते.


केंद्राच्या सध्याच्या शेतकरी कायद्यांची मुळं काँग्रेसनं 2006 मध्ये आणलेल्या 'करार शेती कायद्या'त असल्याचं असल्याचं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे. केंद्रानं आणलेले कायदे काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच विचारांचं रूप आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीला भाजप-संघापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच अधिक जबाबदार असल्याचा टोला यावेळी आंबेडकरांनी लगावलाय. सध्याच्या कायद्यांना असलेला विरोध आजच्या दिल्लीतील घटनेमुळे काँग्रेसला मोडून तर काढायचा नाही ना?, असा उलट सवाल आंबेडकरांनी काँग्रेसला केला आहे. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी ही संघ-भाजपाची 'बी टीम' तर नाही ना?, असा तिरकस सवालही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.


...तर ही 'वेळ' आली नसती : प्रकाश आंबेडकर


संसदेमध्ये शहाणपण-समंजसपणा चालतो, दादागिरी चालत नाही. सुदृढ लोकशाहीसाठी बहुमत असलं तरी दादागिरी चालताही कामा नये, असं आंबेडकर म्हणालेत. या विधेयकासंदर्भात कायदा करण्याआधी देशव्यापी चर्चा केंद्र सरकारला घडवून आणता आली असती. या चर्चेवरूनच संसदीय समिती आणि त्यानंतर सरकारला हे विधेयक आणि त्यानंतरचा कायदा हवा की नको?, हा निर्णय घेता आला असता. यामूळे देश ज्या परिस्थितीतून आज जात आहे, ती वेळ देशावर आली नसती असं आंबेडकर म्हणालेत. मात्र, भाजपला पतपुरवठा करणाऱ्या काही भांडवलदार घराण्यांना फायदा पोहोचविण्यासाठीच सरकारनं या कायद्याद्वारे त्यांच्यााठी फायदेशीर तरतुदी केल्याचा गंभीर आरोप यावेळी आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.


 कायद्यासंदर्भातील प्रश्नांची उत्तर द्यायला सरकार का घाबरते? : प्रकाश आंबेडकर


केंद्राच्या या तिन्ही कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांना ज्या प्रमुख बाबींवर आक्षेप आणि असंतोष आहे त्यावर केंद्र सरकार भूमिका का स्पष्ट करीत नाही?, असा सवाल यावेळी आंबेडकरांनी केंद्राला केला आहे. किमान आधारभूत मुल्य, बाजार समित्यांची व्यवस्था मोडीत निघणार का?, करार शेतीबद्दल शेतकऱ्यांच्या मनात असलेले प्रश्न आणि कायद्यामुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल का?, यावर सरकार ठोस भूमिका मांडत नसल्यानेच हा प्रश्न चिघळल्याचा आरोप यावेळी आंबेडकरांनी केला आहे. यातून आज झालेला हिंसाचार आणि शेतकर्यांनी लाल किल्ल्यावर मांडलेलं ठाण यावर आंबेडकरांनी चिंता व्यक्त केली आहे.


संबंधित बातम्या :