पुणे : आगामी निवडणुकांमध्ये पुरोगामी पक्षांना एकत्र घेऊन, 'वंचित बहुजन आघाडी' बॅनरखाली लढणार आहोत. त्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी होऊ शकतात, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. पुण्यामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जो पक्ष भटक्या विमुक्त, माळी, आलुतेदार आणि मुस्लिमांना प्रत्येकी दोन उमेदवार देईल, त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं आंबेडकरांनी सांगितले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का हा प्रश्न आहे. यापूर्वीही 2009 च्या निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकर यांनी रिडालोस अर्थात रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीचा प्रयोग केला पण त्याला फारसं यश मिळालं नव्हतं.
...तर सरकार अल्पमतात येईल
'मेहबूबा मुफ्ती सरकारचं जे जम्मू काश्मीरमध्ये झालं तेच महाराष्ट्रातही होईल. पावसाळी अधिवेशन मुंबईत घ्यावं अशी शिवसेनची भूमिका आहे, तर अधिवेशन नागपूरला घ्यावं यासाठी भाजप आग्रही आहे. या वादातून शिवसेना पावसाळी अधिवेशनाला गेली नाही तर हे सरकार अल्पमतात येईल', असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
'शरद पवार प्रतिगामी नाहीत'
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, 'मी शरद पवारांना प्रतिगामी मानत नाहीत. मात्र त्यांच्या काही भूमिका प्रतिगामी आहेत. पण त्यांनी त्यांच्या काही भूमिकांमध्ये सुधारणा करायला हव्या. शरद पवार यांनी महात्मा फुलेंची पगडी स्वीकारली याचा आम्हाला आनंद आहे.'
'भीमा कोरेगाव प्रकरणात अडकवण्याच प्रयत्न'
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणावर बोलतांना, प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ' या प्रकरणाची चौकशी करताना आधी नक्षलवादी संबंध दिसला नाही. आता पोलिसांकडून तसा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पोलीस त्यांच्याच जाळ्यात अडकत आहेत. संभाजी भिडे हे आरएसएसच्या कोअर ग्रुपमधील व्यक्ती आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागल्याने ते चिडले आहेत. पी बी सावंत आणि बी जी कोळसे पाटील हे दोघे निवृत्त न्यायमूर्ती असल्याने पोलीस त्यांना हात लावू शकत नाहीत. त्यामुळे पोलीस माझ्या मागे लागले आहेत. मला चौकशीला बोलावण्याआधी मी पोलिसांना नोटीस पाठणार आहे आणि वकिली हिसका दाखवणार आहे'
'दाभोलकर-पानसरेंच्या मारेकऱ्यांची पोलिसांना माहिती'
'नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्यांची पोलिसांना माहिती आहे. मारेकरी सत्ताधारी पक्षाशी संबधित आहेत. त्यामुळे या मारेकऱ्यांना वाचवलं जात आहे. राजकारणाची बदलती हवा पाहून पोलिसांनी दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एकाला अटक केली. मात्र सूत्रधारांना पोलीस हात लावत नाहीत', असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर केला.