रायगड : महडमध्ये सोमवारी घडलेली विषबाधेची ही घटना घातपात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने घटनेचा शोध पोलीस घेणार आहेत. पूजेच्या जेवणातून 80 जणांना विषबाधा झाली होती, यामध्ये तीन चिमुरड्यांसह चौघांना जीव गमवावा लागला होता. संपूर्ण प्रकरणाच्या तपासणीसाठी पोलिसांनी चार पथकं तैनात केली आहेत.
घटना घडल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले होते. विषबाधेचा प्रकार संशयास्पद असल्याचे अनेकांनी म्हटलं होतं. या सर्वाची शहानिशा करण्यासाठी पोलिसांची चार पथकं तयार करण्यात आले असून हा अपघात आहे की घातपात? हे तपासण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनामार्फत विविध नमुने घेण्यात आले असून त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
रायगडच्या महडमध्ये सोमवारी पूजेच्या जेवणातून 80 जणांना विषबाधा झाली होती. या घटनेत तीन चिमुरड्यांसह चौघांना जीव गमवावा लागला. खालापूर तालुक्यातील महडमध्ये सुभाष माने यांच्या घरी वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. पूजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर जवळपास 80 जणांना विषबाधा झाली होती. त्यापैकी 19 गावकरी आणि नातेवाईक हे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.