Prakash Ambedkar on Baramati Loksabha : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Eelection 2024) उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या वाटाघाटी झाल्या आहेत, ही चांगली बाब असून आम्हाला कोणत्या जागा हव्या आहेत याबाबत वाटाघाटी करू, पुढील बैठका लवकर होतील, अशी आशा असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू अशी आशा असल्याचेही यावेळी म्हणाले. अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्यानंतर बोलणी थांबली होती, पण पुन्हा सुरू होणार म्हणाल्याने चांगली बाब आहे. आमचा मसुदा आम्ही दिला आहे. पुढे मसुद्यावर एकमत होईल. सगळ्यांचे मसुदे बघून सर्वसमावेशक मसुदा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
प्रकाश आंबेडकर राज्यात नव्हे तर देशात सर्वाधिक हाय होल्टेज होईल, अशी शक्यता असलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीवरही भाष्य केले.
बारामती लोकसभेवर काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
बारामती लोकसभेला सुप्रिया सुळे यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. पक्ष आणि चिन्ह मिळताच अजित पवारांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवरही हल्ला सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आले असता त्यांनी एकाच वाक्यात उत्तर देत कल स्पष्ट केला. बारामतीमध्ये शरद पवार यांचा वरचष्मा राहील असे वाटते, असे आंबेडकर म्हणाले.
केंद्रात भाजप आणि आरएसएसची सत्ता आम्ही येऊ देणार नाही
दरम्यान, भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरही प्रकाश आंबेडकर यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, भाजपचा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे कारण भाजप घाबरला आहे. पीएम मोदी जो काही 400 प्लस नारा देत आहेत, पण आम्ही भाजपचा 400 चा आकडा आम्ही मानत नाही. केंद्रात भाजप आणि आरएसएसची सत्ता आम्ही येऊ देणार नाही, ही काळजी घेऊ, असेही ते म्हणाले. आता त्यांचा नवीन अवतार आहे, मला देवाने आदेश दिला राम मंदिर बांधण्याचा असे म्हणाले. त्यामुळे साधू संत प्रचंड संतापले असल्याचेही ते म्हणाले.
जरांगे पाटील यांना वाटते फसवले
प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना फसवलं असल्याची भावना झाल्याचे सांगितले. जो तोडगा काढला जाणार होता त्यावेळी सगळ्यांना बोला, त्यांच्या मागण्यांचा समावेश झाला पाहिजे असे मी सांगितले होते. सगेसोयरेचा समावेश झाला नाही, असे जरांगे म्हणत आहेत, मग सरकारने समजावून सांगितले पहिजे, असे ते म्हणाले.
त्यामुळे हे आंदोलन आहे तिथेच आहे, कुणबी बाहेरच्या मराठ्यांना हे आंदोलन आहे हे सांगण्यात सरकार अपयशी ठरले आहे. न्यायधीशांचा राजीनामा सुद्धा पुढे न्यायालयात येऊ शकतो. मला वाटते जरांगे आणि ओबीसी आंदोलन सुरू करतील, असेही त्यांनी सांगितले. एवढ्या लवकर हे आंदोलन संपेल असे वाटत नाही, मागणी जशास तशी मान्य नाही. त्यामुळे आंदोलनावर शंका घेण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे यांनी अपक्ष लोकसभा लढवावी. त्यांनी विधानसभेत जोर लावला, तर राज्यातील सत्तेवर त्यांचा प्रभाव मोठा राहील. सत्तेत येऊन आपला लढा अधिक टोकदार करावा, असेही त्यांनी आवाहन केले.
इतर महत्वाच्या बातम्या