Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू झालेल्या वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे अधिकृत चर्चेचं  निमंत्रण आल्याने चर्चेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडी तसेच महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी कोणतेच निमंत्रण नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे चर्चा होणार तरी कधी? अशी चर्चा रंगली होती. मात्र, गेल्या 24 तासात इंडिया आघाडीमध्ये झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना तातडीने चर्चेसाठी बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.

  






तर आम्ही भारत जोडो यात्रेत कसं सामील होणार?


विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये (Bharat Jodo Nyay Yatra) सहभागी होण्याचं निमंत्रण वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) देण्यात आलं होतं. मात्र, इंडिया किंवा महाविकास आघाडीचा घटक पक्ष नसताना भारत जोडो यात्रेमध्ये सामील होणं आमच्यासाठी अडचणीचं ठरू शकेल असं प्रकाश आंबेडकरांनी मत व्यक्त केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष हा विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये सामील होणार अशी चर्चा आहे. त्याबाबत दिल्लीमध्ये बैठक झाली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून मान्यता आहे. पण अंतिम निर्णय मात्र अद्याप झालेला नाही. 


राजू शेट्टी यांना निमंत्रण नाही 


दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या बैठकीचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत एबीपी माझाला माहिती दिली आहे. शिवाय राजू शेट्टी सध्या एकला चलो रेच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीचे मला निमंत्रण आलेले नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना सोडण्याची शक्यता आहे. पण राजू शेट्टी मात्र एकला चलो रेच्या भूमिकेवर अजून तरी ठाम आहेत.  


जागावाटपावर चर्चा होणार? 


राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्षामध्ये जागावाटपावरुन अद्याप एकमत झाले नाही. शिवसेना 23 जागांवर ठाम आहे. त्याशिवाय काँग्रेसलाही जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांत बैठकात तोडगा निघालेला नाही. त्यात प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना तीन जागा देण्याबाबत चर्चा सुरु आहे.


इतर महत्वाच्या बातम्या