अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला 12 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसेच आम्ही चर्चा करायला तयार आहोत. चर्चा करायची असेल तर लगेच करा, आम्ही वाट पाहणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.


वंचित बहुजन आघाडी महासंघाची जाहीर सभा रविवारी अमरावतीच्या सायन्सकोर मैदानात पार पडली. या सभेत बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवार नाहीत, त्या मतदारसंघांमध्ये आम्ही उमेदवार उभे करु. आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मात्र चर्चा करायची असेल तर लगेच करा, आम्ही वाट पाहत बसणार नाही.


लोकसभा निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीला आमची गरज आहे. आम्ही काँग्रेसला 12 जागांचा प्रस्ताव दिला आहे, मात्र आम्ही त्यांच्या भरवशावर नाही, असंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.


आगामी लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणाही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली. गुणवंत देवपारेंना लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवारी जाहीर कारण्यात आली आहे. एमआयएमचे आमदार वारीस पठाणही यावेळी उपस्थित होते.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही आंबेडकरांनी निशाणा साधला. विदर्भातील संत्र्याला शरद पवारांनीच शापित केलं असल्याचा आरोप आबंडेकरांनी यावेळी केला. विदर्भातील संत्र्याच्या बियांमध्ये अॅसिड असते असं सांगितल्यानेच आज विदर्भातील संत्र्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. यासाठी शरद पवारच जवाबदार असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.