औरंगाबाद : औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर अनुसुचित जाती-मुस्लीम ऐक्याचा एल्गार बघायला मिळाला. कारण ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल ए मुसलमिनचे (MIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर आले. बहुजन वंचित आघाडीच्या पहिल्या सभेसाठी तब्बल 5 लाख लोकांचा समुदाय जमवण्याचा निर्धार करण्यात आला होता.


सभेकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे. अनुसुचित जाती आणि मुस्लीम समाजाच्या मतांची विभागणी टाळण्यासाठी हे दोन बडे नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे राजकारणातील नव्या राजकीय मैत्रीच्या समीकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार असल्याचं दिसून येत आहे.


राजकारणातील जात फॅक्टर


निवडणुकीच्या राजकारणात जात फॅक्टर महत्वाचा आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात मुस्लिम आणि अनुसुचित जाती-जमातींचा मोठा समुदाय आहे. त्यामुळे ही मतं प्रकाश आंबेडकरांसोबत गेली, तर धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी नक्की वाढेल, असा दावा राजकीय अभ्यासकांनी केला आहे.


समुदायानुसार जर राजकीय ताकदीचा अंदाज घेतला तर मुस्लीम समाज 8 टक्के, अनुसुचित जाती- 8 टक्के, आदिवासींची संख्या 8 टक्के एवढी आहे. त्यामुळे या 28 टक्के व्होटबँकेचे आंबेडकर-ओवेसी मोठे भागीदार असतील. 30 वर्षानंतर आता पुन्हा आंबेडकर आणि ओवेसी एकत्र येतायत. प्रयोग सेम आहे. पण दोघांची ताकद जास्त आहे.


अनुसुचित जाती-मुस्लीम ऐक्याचा याआधीही प्रयत्न 


अनुसुचित जाती-मुस्लीम ऐक्याचा हा पहिला प्रयोग नाही. याआधी 30 वर्षांपूर्वी कुख्यात हाजी मस्तान आणि जोगेंद्र कवाडेंनी हातमिळवणी केली होती. त्यांनी अनुसुचित जाती मुस्लीम मुक्ती सेना स्थापन केली होती. पण संघटनात्मक बांधणी नसणं, किमान समान कार्यक्रम नसणं आणि लोकांचा पाठिंबा नसल्यानं ती आघाडी फेल ठरली.


आंबेडकर आणि ओवेसी यांची राजकीय ताकद


महाराष्ट्र विधानसभेत एमआयएमचे दोन आमदार आहेत. औरंगाबाद पालिकेत एमआयएमचे 24 नगरसेवक आहेत. भारिप बहुजनचे बळीराम शिरसकर विधानसभेत आहेत. कधीकाळी सत्ता असलेल्या अकोला पालिकेत भारिप बहुजनचे 3 सदस्य आहेत. भारिप-बहुजनचा अकोला, वाशिम, बुलढाण्यात प्रभाव आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात ओवेसींना चांगली प्रतिसाद मिळतो.


हे सगळं असलं तरी आंबेडकर आणि ओवेसी म्हणजेच अनुसुचित जाती आणि मुस्लीम नाहीत. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, आनंदराज आंबेडकर असे अनुसुचित जाती-जमातीच्या नेत्यांचे किमान डझनभर गट आहेत. त्यामुळे मतांची विभागणी अटळ आहे. शिवाय मुस्लिमांमध्ये 2014 इतकी एमआयएमची क्रेझ नाही.


त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवेसी एकत्र आल्यानंतर ते काँग्रेस-राष्ट्रवादीचं नुकसान नक्की करतील. जो अर्थात भाजपचा फायदा असेल. पण दलित मुस्लिमांचा किती फायदा होईल हे येत्या काळात स्पष्ट होईल.