अकोला : 'प्रहार जनशक्ती पक्षा'चे अकोला जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अकोट शहरातील कबुतरी मैदानाजवळच्या पोलिस वसाहतीमध्ये शुक्रवारी रात्री त्यांच्यावर दोघा अज्ञातांकडून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. घटनेनंतर त्यांना तत्काळ अकोला येथे हलविण्यात आले होते. परंतु, रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हे त्यांच्या खुमकर दूध डेअरीच्या बाहेर शुक्रवारी रात्री दहा-साडे दहाच्या सुमारास मोबाईलवर बोलत वसाहतीत चालले होते. या ठिकाणी दोन दुचाकीस्वार त्यांच्याकडे येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांना हल्ल्याची कुणकुण लागताच ते पोलीस वसाहतीकडे पळाले. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. यात त्यांना पाठीत दोन गोळ्या लागल्या. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने पोलिस कर्मचाऱ्यांनी समोर असलेल्या डॉ. सुरेश व्यवहारे यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी त्यांची प्रकृती बिघडल्याने आणि रक्तस्त्राव झाल्याने त्यांना अकोला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Rural News | नंदुरबारमध्ये राज्यपाल कोश्यारींनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका | माझं गाव माझा जिल्हा



दरम्यान, काल रात्री पासून आकोट येथे मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पालकमंत्री बच्चू कडू हे रात्रीपासूनच अकोल्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील उदयोन्मूख नेतृत्व म्हणून समोर येत असलेल्या तुषार यांचं वय अवघ्य़ा 27 वर्षांचे होते.

घटनास्थळावरून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या हल्यामागची नेमकी कारणं कोणती?, याचा तपास पोलीस करीत आहेत. हल्ल्यानंतर दोन्ही मारेकरी दुचाकीने पसार झालेत. याप्रकरणी अकोट शहर पोलीसांनी आरोपींच्या धरपकडीसाठी नाकाबंदी सुरु केली आहे.

कोण होते तुषार पुंडकर?

  • राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या 'प्रहार जनशक्ती पक्षा'चे माजी जिल्हाध्यक्ष

  • बच्चू कडू यांच्या पक्षाचा जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चित चेहरा

  • सध्या अकोला जिल्हा सहकारी दुध संघाचे अध्यक्ष

  • नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकोटमधून 25 हजारांवर मते

  • बच्चू कडू स्टाईल आंदोलनांनी अनेक प्रश्नांवर आक्रमक भूमिका

  • राष्ट्रवादीतून राजकीय करियरला केली होती सुरुवात

  • आई अकोट नगरपालिकेत नगरसेविका

  • तुषार 11 सप्टेंबर 2013 रोजी झालेल्या अकोट येथे गणेशोत्सवादरम्यान झालेल्या तेजस सेदाणी हत्याकांडातील प्रमुख आरोपी