Money Laundering Case : आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई केली आहे. पटेल यांचं मुंबईमधील वरळी येथील चार मजली घर ईडीने (Enforcement Directorate, ED) जप्त केले आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू इकबाल मिर्ची प्रकरणात (Underworld gangster Iqbal Mirchi case) ईडीने ही कारवाई केली आहे.  ईडीच्या परवानगीशिवाय प्रफुल्ल पटेल यांना हे घर विकता येणार नाही. 

Continues below advertisement


अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर ईडीने राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई केली आहे. नवाब मलिक यांचेही नाव कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडलं गेलं होतं. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांचं नाव दाऊदशी जोडण्यात आले आहे.  प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे, निकटवर्तीय म्हणून ओळख आहे.






या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून दोनवेळा चौकशी झाली आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये ईडीने प्रफुल्ल पटेल यांनी 12 तास चौकशी केली होती.  दोनवेळा केलेल्या चौकशीनंतर ईडीने जो तपास केला. त्यानंतर पटेल यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली.  वरळी येथे सीजे हाऊस एक मोठी इमारत आहे. याआधी येथे एक छोटी इमारात होती, ती इक्बाल मिर्ची याच्या मालकीची होती. प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने या इमारातीचा पुनर्विकास केला. पटेल यांच्या कंपनीने इमारतीच्या जमिनीच्या बदल्यात इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाला जमीन आणि पैसे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय आल्यानंतर ईडीकडून कागदपत्रांची छाननी केली गेली. अखेर या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांची दोनवेळा चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांच्या सीजे हाऊसमधील घरावर जप्तीची कारवाई केली आहे.