रायगड : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे बुजवण्याचं काम अद्याप सुरूच आहे. यामध्ये, रायगड जिल्ह्यातील नागोठणे ते सुकेळी दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे जशास तसे आहेत. या मार्गावर दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई-गोवा हायवेची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करणं जिकरीचं झालंय. त्यातच, गणेशोत्सवाच्या तोंडावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सायन ते सिंधुदुर्ग दरम्यानच्या रस्त्याची पाहणी केली. 9 सप्टेंबरपर्यंत सर्व खड्डे बुजविण्यात येणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या आश्वासनाची डेडलाईन आज संपली. या रस्त्याची पाहणी केली असता पनवेल ते वडखळ दरम्यानच्या मार्गावरील बहुतांश खड्डे बुजवण्यात आले आहेत. मात्र आजही काही ठिकाणी काम सुरु असून सुमारे 10 ते 15 टक्के काम शिल्लक असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, पेण ते वडखळ दरम्यान होणारी वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसवण्यात आले आहेत. तर, वडखळ ते सुकेळी दरम्यानच्या मार्गावर आजही नागोठणेनजिक रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु आहे. याच रस्त्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून मात्र खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत आहे.
वाकण ते सुकेळी दरम्यानच्या मार्गावरील खड्ड्यांमध्ये खडीची भर टाकण्यात आली असल्याने या संपूर्ण मार्गावर खड्डे आजही कायम आहेत. यामुळे नागोठणे ते सुकेळी दरम्यान आजही सुमारे 30 टक्के काम बाकी असल्याचं दिसून आलं. पनवेल ते सुकेळी दरम्यानच्या सुमारे 70 किमी मार्गावर सुरु असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ होत आहे.
मुंबई-गोवा हायवेवर खड्डे बुजवण्याचं काम सुरुच, डेडलाईन हुकली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Sep 2018 08:30 PM (IST)
रायगड जिल्ह्यातील नागोठणे ते सुकेळी दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे जशास तसे आहेत. या मार्गावर दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -