औरंगाबाद: राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेतील महत्वाचा चेहरा आणि आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे चर्चेत राहणाऱ्या पूजा मोरे (Pooja More) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पूजा मोरे यांनी आज शरद पवारच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आता रस्त्यावरच्या लढाई सोबतच लोकशाहीची देखील लढाई  लढाईची असून, यासाठी आपण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असल्याचं पूजा मोरे यावेळी म्हणाल्या. 


शेतकरी प्रश्नासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पूजा मोरे सतत आंदोलन करत असतात. त्यांच्या आगळावेगळ्या आंदोलनाची नेहमीच चर्चा देखील असते. अनेकदा त्यांच्या आंदोलनाची थेट प्रशासनाला दखल घ्यावी लागली आहे. गेली काही वर्षे त्या राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेत काम करत होत्या. मात्र, आज पूजा मोरे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. 


दरम्यान राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यावर पूजा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. "आजपर्यंत मी रस्त्यावरची लढाई लढत होते. या काळात अनेक लाठ्या-काठ्या खाल्या, रक्त सांडले. अनेक गुन्हे अंगावर दाखल झाले. परंतु आता रस्त्यावरच्या लढाई सोबतच लोकशाहीच्या मंदिरातील लढाई देखील लढली पाहिजे. त्यामुळेच आज आम्ही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. 


माझ्यासाठी शरद पवार पोलिसांना फोन करायचे...


शेतकरी संघटनेत असताना जेव्हा रस्त्यावरची लढाई लढत होते. त्यावेळी जेव्हा-जेव्हा पोलिसांनी लाठ्या-काठ्या हाणल्या तेव्हा शरद पवार पोलिसांना फोन करायचे. आपल्या पक्षात नसली तरीही ही कार्यकर्ता चांगलं काम करते, म्हणून पोलिसांना सांगून साथ दिली. सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असतांना शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू पाहिल्यावर मला माझ्या बापाची आठवण आली. त्यामुळे आज मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याचं त्या म्हणाल्या. 


योग्यवेळी समाचार घेईल...


माझ्यासाठी आजचा दिवस सर्वात मोठा आणि आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे चळवळीवर टीका करणारी कार्यकर्ती मी नाही. त्यामुळे चळवळी विषयी काही बोलणार नाही. मात्र, योग्यवेळी आपल्यासमोर सर्व समाचार सांगेल. पण, आजची ती वेळ नाही. माझ्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे, त्यामुळे आज मी काहीच बोलणार नाही. तर, शरद पवारांचा मला फोन आला आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असल्याचं पूजा मोरे म्हणल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


'स्वाभिमानी'ची वाघिण पूजा मोरे यांचं राजू शेट्टी यांना रक्ताने पत्र