Pooja Khedkar: यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर आता दुसरीकडे न्यायालयानेही पूजा खेडकरला (Pooja Khedkar) दणका दिला आहे. पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे. पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिस तिला कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता होती.
पूजा खेडकरचा (Pooja Khedkar) न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर ती भारतातून थेट परदेशात पसार झाली असावी, अशी शक्यता अनेक वृत्तपत्रांमध्ये व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पूजा खेडकर (Pooja Khedkar) वरती अनेक आरोप करण्यात आले आहेत. इतर मागासवर्ग प्रवर्गातून पूजाने खेडकरने 12 वेळा UPSC परीक्षा दिल्याचे समोर आले आहे.
त्याचबरोबर पूजा खेडकरला (Pooja Khedkar) मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये देखील गैरवर्तन केल्यामुळे तब्बल आठ वेळा मेमो देण्यात आल्याची माहिती आहे. 2022 मध्ये आयएएसमध्ये निवड होण्यासाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातील नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्राचाही लाभ पूजा खेडकरने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने तब्बल 7 वेळा आपलं नाव बदलून परिक्षा दिल्याची माहिती आहे.
यासह इतर कारणांवरून पूजा खेडकर (Pooja Khedkar) विरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाने फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल केला होता. अटक होऊ नये, यासाठी तिने दिल्लीतील पटियाला हाउस या न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर बुधवारी सुनावणी पार पडली आणि निकालाबाबत पुन्हा गुरुवारी सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे पूजाला केव्हाही अटक होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरू आहे.
दिल्लीतील एका नेत्याच्या घरी मुक्काम?
पूजा खेडकर (Pooja Khedkar) दरम्यानच्या काळात दिल्लीतच एका मोठ्या नेत्याच्या घरी मुक्कामी असल्याची माहिती लोकमतने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. तर अटकपूर्व जामीन फेटाळला जाईल, याची माहिती मिळताच दुबईला पसार झाल्याची चर्चा सुरू आहे.
नातेवाईकांच्या मदतीने पूजा खेडकर परराज्यात लपली?
पूजा खेडकर (Pooja Khedkar) तिच्या नातेवाईकांसोबत परराज्यात लपली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांची पथके तिच्या मागावर आहे. ती दुसऱ्या राज्यातून वकिलांशी संपर्क साधत असल्याची माहिती होती. तिचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर ती आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. तिने केलेल्या फसवणूकीची सखोल चौकशी व्हावी यासाठी पोलिस पूजा खेडकरचा (Pooja Khedkar) कसून तपास करत आहेत.