Nagpur News : नुकत्याच झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या आखाड्यात राजकीय 'दंगल' पहायला मिळाली. त्या पाठोपाठ आता सभापतीपदाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबर निवडणुका होणार असून या निमित्ताने पुन्हा एकदा जिल्ह्यात राजकीय धुरळा उडणार आहे.


जिल्हा परिषदेतील (Nagpur Zhilla Parishad) विद्यमान विषय समिती सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ 17 जुलैलाच संपुष्टात आला होता. मात्र, ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने तत्त्कालीन अध्यक्ष व उपाध्यक्षांसोबतच विषय समिती सभापतींनाही शासनाकडून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. नुकतीच अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आहे. तर आता समाजकल्याण, महिला व बाल कल्याण, कृषी व पशुसंवर्धन आणि शिक्षण व वित्त सभापतींची निवड होणार आहे. 


निवडणूक कार्यक्रम


1 नोव्हेंबरला उपविभागीय अधिकारी (नागपूर ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत नामनिर्देशनपत्र वाटप व स्वीकारण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता विशेष सभेला सुरुवात होईल. दुपारी 3.05 ते 3.15 यावेळेत नामनिर्देशनपत्राची छाननी होईल. 3.15 ते 3.30 यावेळेत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. त्यानंतर गरजेनुसार दुपारी 3.45 वाजतापासून मतदानास सुरुवात होईल. 


इच्छुकांची भाऊगर्दी, बंडाळीची शक्यता!


जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सत्तापक्ष कॉंग्रेसने (Congress) सत्ता कायम राखली असली तरी बंडखोरीचाही सामना करावा लागला. जेष्ठांना डावलले गेल्याने सत्तापक्षामधील सदस्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. त्यातच आता सभापतीपदाची निवडणुक होणार असल्याने बंडखोरीची मालिका कायम राहणार आहे. आरक्षण आणि नेत्यांच्या निर्णयामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पद हुकलेल्या इच्छुकांचा डोळा 'मलाईदार' विषय समिती सभापती पदावर आहे. 


राष्ट्रवादीलाही अपेक्षा
समाजकल्याण आणि शिक्षण समिती यासारख्या मलाईदार विभागांच्या सभापतीपदासाठी अनेक जण इच्छुक आहे. अनेकांनी 'फिल्डिंग'ही लावली आहे. काँग्रेसचेच डझनभर सत्तेत या पदासाठी इच्छुक आहेत. सत्तेत सहभागी राष्ट्रवादीकडूनही (NCP) दोन सभापती पदांची मागणी सुरू आहे. ही स्थिती लक्षात घेतल्यास पुन्हा एकदा बंडाळी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


इतर महत्त्वाची बातमी


AAP Nagpur : खड्ड्यांवर लावले झोनच्या इंजिनियरचे फोटो अन् झटक्यात निघाला तोडगा; 'आप'च्या 'गांधीगिरी'नंतर मनपाला जाग