वसंत पुरके, राजेंद्र दर्डा, आणि आता विनोद तावडे. हे तिघेही महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री राहिलेले आहेत. हे मंत्रीपद सांभाळल्यानंतर वसंत पुरके, राजेंद्र दर्डा या दोघांनाही पराभवाचा झटका बसला होता. तर विनोद तावडेंना तर विधानसभेचं तिकीटच नाकारलं गेलं आहे.
'एकूण काय तर राज्यातल्या शिक्षकांचा तळतळाट लय बेक्कार', 'तिसऱ्या लिस्टमध्ये नाव नाही आल्यावर कसं वाटतंय' अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राज्यातलं शिक्षणमंत्रीपद हे गेल्या काही काळात अनेकदा वादग्रस्त राहिलं आहे. त्याला तावडेही काही अपवाद राहिले नाहीत. शिक्षक भरतीचा विषय प्रलंबित राहिला, अधिकच्या 20 गुणांची पद्धत त्यांनी बंद केल्यानं मोठा वाद झाला. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या अजेंड्यावर तावडे कायम राहिले. आपलं काय चुकलं याचं आत्मपरीक्षण करु असं ते आता म्हणत आहेत.
आघाडी सरकारच्या काळात वसंत पुरके हे राज्याचे शिक्षणमंत्री होते. शिक्षकांसाठी अशैक्षणिक कामांची सुरुवात त्यांच्याच काळात झाल्याचा आरोप होतो. अनेक वाद झाल्यानंतर त्यांचं खातं बदलण्यात आलं. यवतमाळमधला राळेगाव हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ. सलग चारवेळा निवडून येणाऱ्या पुरकेंना 2014 मध्ये मात्र पराभवाचा झटका बसला होता.
पुरके यांच्यानंतर राजेंद्र दर्डा हे त्यानंतर राज्याचे शिक्षणमंत्री बनले. 2014 मध्ये औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून त्यांनाही पराभवाचा झटका बसला होता. त्यामुळे पुरके, दर्डा, आणि आता तावडे. शिक्षणमंत्री बनलेले हे नेते आपल्याच राजकीय परीक्षेत फेल होते गेलेत. आता याला अनोखा योगायोग म्हणायचं नाही तर काय म्हणायचं.