Supriya Sule : राज्यातील गद्दार सरकारची अॅनिवर्सरी आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी 20 तारखेला गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिले, तर सांभाळून राहा, अशी मिश्किल टीका खासदार सुप्रिया सुळे केली आहे. मतदारसंघातील लोकांना सावध राहण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या इंदापूर (Indapur) तालुक्यातील न्हावी गावात नागरिकांशी संवाद साधत होत्या त्यावेळी त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
त्या म्हणाल्या की, रॅडिसन हॉटेलमध्ये राहण्याचे निमंत्रण दिले तर सांभाळून राहा, विचार करा. गद्दारांना खाजगी हॉटेल लागले, प्रायव्हेट खाजगी विमानसुद्धा लागले. गद्दारी करताना कोणालाही, असे वाटले नाही की आपल्या मतदारसंघात जावे, लोकांना विचारावे. गावभेटी घ्याव्यात, लोकांना सांगावे हा मी निर्णय घेतोय. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहाल का? असे एखाद्याने विचारलं नाही." "तुम्ही पक्ष बदलत आहात. विचारधारा बदलता, सरकार पाडता. लोकांना विश्वासात घ्यावे असे का वाटले नाही?, तिकडे गुवाहाटीमध्ये एकमेकांना मिठ्या मारता, शॉर्ट कपडे घालता, तुम्ही सुट्टीला गेला होता की देशाच्या सेवेसाठी गेला होता?" असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
'मिंदे सरकार म्हणणं पटू लागलं'
"कालच एक बातमी ऐकली की, भारतीय जनता पक्षाने शिंदे सरकारला सांगितले आहे की तुमचे पाच मंत्री काढून टाका. मी विचार करते काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनेक वर्ष सत्तेत होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांना सांगू शकत नाहीत की कोणी कोणाला मंत्री करायचे. कॉंग्रेसने त्यांचे मंत्री करायचे आणि बाकी पक्षांनी त्यांचे मंत्री करायचे. उद्धवजी म्हणायचे की हे मिंधे सरकार आहे. ती आता मला आता पटू लागले आहे. या सरकारने गद्दारी केली यात काही वाद नाही. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला. ते हयात असताना पक्ष उद्धव ठाकरेंना दिला. त्यामुळे तो पक्ष कोणाला घ्यायचा अधिकार नाही," असंही त्यांनी म्हटलं आहे.
'केंद्र आणि राज्य सरकारवर टीका'
राज्यातील सरकार आणि केंद्र सरकार सातत्याने सगळी धोरणे नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधात राहिले आहेत. दुधाचे भाव पडलेले आहेत कांदा असेल किंवा टोमॅटो असेल यामध्ये कशाला भाव नाही. सातत्याने मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचा सातत्याने केंद्र व राज्य सरकार करत आहे, असा आरोपही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केला आहे.