नांदेडः पोलीस स्टेशनमध्ये फेऱ्या मारुनही गुन्हे दाखल होत नाहीत, अशा अनेक तक्रारी आहेत. पण नांदेड पोलीस मात्र याला अपवाद ठरले आहेत. अट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यात नांदेड पोलिसांनी भाजप नेत्याच्या ईमेलवर प्राप्त झालेल्या तक्रारीवरून महिलेवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.     तक्रारदाराची स्वाक्षरी नसताना देखील अॅट्रॉसिटीसारख्या गंभीर गुन्हा एका महिलेवर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून एवढा कर्तव्यदक्षपणा दाखवण्याचा हा बहुदा राज्यातील हा पहिलाच प्रकार असावा.   काय आहे प्रकरण?   व्हॉट्सअप ग्रुपवरुन शिवसेना महिला पदाधिकारी महिलेला अश्लील मेसेज पाठवल्याचा गंभीर आरोप सुभाष वानखेडेंचा मुलगा भास्कर वानखेडेवर आहे. संबंधित महिलेने हे आरोप केले आहेत. याप्रकरणी भास्करवर विनयभंगाची तक्रार दाखल झाली आहे.     महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर वानखेडेही गप्प राहिले नाही. महिलेविरोधात बोलताना सुभाष वानखेडेंची जीभ चांगलीच घसरली. पोलिसांना ई-मेल करुन महिलेविरोधात अॅट्रॉसिटीची तक्रार दिली. भाजप नेत्याच्या मुलाची तक्रार आल्यावर फडणवीस सरकारच्या कर्तव्यदक्ष पोलिसांनीही तत्परता दाखवली. विशेष म्हणजे ई-मेवरील तक्रारीत तक्रारदारांची सही नसतानाही महिलेविरोधात गुन्हा नोंदवला.     पोलीस स्टेशनला खेटे मारुनही पोलीस तक्रार दाखल करुन घेत नाहीत हे वास्तव आहे. पण भाजप नेत्यांच्या मुलाची तक्रार सही नसताना ईमेलवरुन नोंदवून घेतली. त्यामुळे पोलिसांच्या भूमकेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं. त्यामुळे भाजप नेत्याच्या चिरंजीवासाठी दिलेली ही ट्रिटमेंट फडणवीसांच्या पोलिसांनी सामान्यांनाही द्यावी इतकंच.