हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याने पानी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. वॉटरकप पुरस्कार मिळावा यासाठी आता पोलीस विभागाने सांडस हे गाव दत्तक घेतले असून, स्पर्धा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी स्वतः श्रमदान करुन गावकऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत.


एरवी आंदोलन झालं किंवा गुन्हा घडला की येणारे पोलिस यातले काहीही झालेले नसताना, हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील सांडस गावात दाखल झाले आहेत. पोलिसांनी इतक्या मोठ्या संख्येने येण्याचे निमित्त आहे वॉटरकप स्पर्धेचे. दुष्काळाला पळवून लावण्यासाठी आता पोलिसांनीही पाऊल उचललं आहे.

सांडस हे गाव पोलिसांनी दोन वर्षांपासून दत्तक घेतले आहे. वॉटरकप स्पर्धेसाठी निवड व्हावी म्हणून पोलिस पुढाकार घेत श्रमदान करत आहेत. नांदेड रेंजचे पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी सांडस गावात चळवळ सुरु केली आहे. चिरंजीव प्रसाद यांच्या चळवळीला पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी मोलाची साथ दिली. या चळवळीत संपूर्ण पोलिस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी श्रमदान करत आहेत.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशन आणि भारतीय जैन संघटना यासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत. कळमनुरी तालुक्यात भारतीय जैन संघटना ग्रामस्थांना प्रोत्साहन देत आहेत.

पानी अडवून जिरवणे ही काळाची गरज असून जलसंधारणासाठी सांडस गावात पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराला सर्व गावकऱ्यांनी साथ देण्याचे आवाहन सांडसच्या ज्येष्ठ नागरिकांनी केले.

जलसंधारण ही आता एक क्रांती झाली असून हिंगोली पोलिसांनी या चळवळीत मोलाची भूमिका हाती घेतली आहे. पोलिसांच्या या चळवळीला नागरिकांची साथ मिळाल्यास सांडसचे रुप पलटायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की.